एकविसाव्या शतकातील मराठी संगीतकार…

…आणि त्याच्यासमोर असणारी आव्हानं


अरूण म्हात्रेंच्या एका कवितेच्या ओळी अशा काही आहेत –


हे कुठले रस्ते आपण घडवित जातो


वळणावर कुठली वळणे दडवित जातो


जरी सूर्य सांगतो दिशा नव्या सोनेरी


हा चंद्र कोवळा पाऊल अडवित राहतो


एकविसाव्या शतकातल्या एका मराठी संगीतकाराच्या मनाची अवस्था साधारण अशीच आहे. सूर्य या नव्या दिशा सांगत असतानाच्या काळात एक मराठी संगीतकार असणं म्हणजे काय या विषयावर हे स्वैर चिंतन आहे असं म्हणायला हरकत नाही.


मी संगीत दिग्दर्शक झालो तेव्हा सातत्याने मला आणि माझ्या सहकाऱ्यांना आपण चुकीच्या काळात संगीत क्षेत्रात आहोत की काय या विचाराने हळहळ वाटत रहायची. सुधीर फडके, गजाननराव वाटवे, वसंत देसाई, वसंत प्रभू, राम कदम, श्रीनिवास खळे, वसंत पवार, आणि त्यानंतर हृदयनाथ मंगेशकर इत्यादी दिग्गजांचं संगीत ऐकुन ज्या चर्चा मित्रांमध्ये व्हायच्या त्या मध्ये या हळहळीला वाचा फुटायची. खंत वेगवेगळ्या प्रकारची होती. एकूण वातावरणात एक उदासीनता होती, फार कमी कवी गीत हा प्रकार हाताळत होते, मराठी संगीताचा बहुतांश श्रोतृवर्ग साठीच्या पुढचा होता कारण (किंवा म्हणून) मराठी संगीताच्या कार्यक्रमांतून जुनी गाणी (५०-६० या दशकातली) प्रामुख्याने ऐकू यायची, नवीन संगीत निर्मितीचं व्यासपीठ म्हणून रेडियोची अनुपलब्धता, नवीन संगीत करणाऱ्यांची, ऐकणाऱ्यांची, आणि ते जिद्दीने आणि नियमितपणे बाजारात उपलब्ध करून देणाऱ्यांची उणीव, मराठी चित्रपटातून संगीताचं लयाला गेलेलं स्थान, अशा नानाविध समस्या मनाला ग्रासून टाकयच्या. पण हळूहळू मला या काळ्या ढगाला असलेली रूपेरी किनार दिसू लागली आणि या काळात संगीत दिग्दर्शक असणं – विशेषत: मराठी संगीत जगताचा एक घटक असण्याची मौज कळू लागली. मराठी संगीताचा फार चांगला काळ नसताना आपण त्याचा एक भाग असायला एक वेगळं भाग्य लागतं. मला ते भाग्य लाभलं या बद्दल संपूर्ण समाजव्यवस्थेचा मी अतिशय ऋणी आहे.


कुठल्याही कलेला प्रतिकूल वाटणारा काळ खरं तर त्या कलेच्या चांगल्या भविष्याचं बीज असतो, असा आशावादी दृष्टीकोन ठेवणं मराठी संगीतासाठी आणि संगीतकारांच्या morale साठी अपरिहार्य आहे. कारण परिस्थिती प्रतिकूल असतानाच ती अनुकूल करून घेण्यासाठी सजग असे प्रयत्न होतात. एका खऱ्या कलाकारासाठी हीच प्रतिकूल परीस्थिती एक आव्हान बनून समोर येते. मराठी संगीताच्या "सुवर्णकाळात' ज्या गोष्टी आपोआप होत असत, त्या आता जाणीवपूर्वक कराव्या लागणार असतात. या काळामध्ये निर्माण होणाऱ्या चांगल्या संगीताचं मोल हे सुवर्णकाळात निर्माण झालेल्या संगीतापेक्षा थोडं का होईना पण जास्त आहे असं मला निश्चित वाटतं.


एका नवीन संगीतकारासमोर येणारी आव्हानं –


खरं तर वरच्या शीर्षकामधला 'नवीन' हा शब्द काढला तरी चालण्यासारखं आहे, कारण यातली काही आव्हानं ही दहा वर्ष काम केल्यानंतर सुद्धा येतच राहतात. आणि क्षेत्रात दहा वर्ष काम करून सुद्धा काही संगीतकार 'नवीन' आणि 'उदयोन्मुख'च राहतात – हे अनेक आव्हानांपैकी एक आहे. परंतु हे पहिलं आव्हान नव्हे.


'मराठी संगीत' या संज्ञेमध्येच 'मराठी गीत' ही संज्ञा दडलेली आहे. आणि इथेच पहिलं आव्हान आपलं डोकं वर करतं. डोकं वर करून पाहिलं तरी सहजासहजी दर्जेदार मराठी गीतकार सापडत नाही – (किंवा दर्जेदार गीतकारांना दर्जेदार संगीतकार सापडत नसावा!) आचार्य अत्रेंना १९२६ साली 'कवी थोडे आणि कवडे फार' असं वाटत होतं तर आज त्यांना काय वाटलं असतं याचा तर्क करावासाच वाटत नाही. पण त्यातून गीत हा काव्यप्रकार (lyric) समर्थपणे हाताळणारा कवी तर फारच विरळा. ज्या काही थोड्या लोकांमध्ये ही क्षमता आढळते त्यांचं त्या craft वर प्रभुत्व असतंच असं नाही. फार पूर्वी दूरदर्शनवर शांताबाई शेळकेंची एक मुलाखत माझ्या मनात घर करून राहिली आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की आपण 'प्रतिभावंत' हा शब्द (genius या अर्थी) फार सरसकटपणे आणि वरचेवर वापरतो. पण प्रतिभावान माणसं फारच कमी असतात – खूप लोकांना त्या त्या कलेचं नैसर्गिक असं अंग असतं (ज्याला त्यांनी talent असं म्हटलं होतं). आपण स्वतः सुद्धा या दुसऱ्या प्रकारामध्ये मोडतो हे आपलं मत त्यांनी अतिशय विनम्रतेने पण matter of fact पद्धतीने मांडलं होतं. त्या पुढे म्हणाल्या होत्या की जे लोक प्रतिभावान नाहीत पण ज्यांच्या अंगी असे नैसर्गिक गुण आहेत त्यांनी त्या कलेची craftsmanship आत्मसात करायला हवी. गीत लिहिण्यासाठी लागणारी संवेदनक्षमता जरी खूप लोकांमध्ये आढळली तरी कारागिरी सापडत नाही. छंद म्हणजे काय? वृत्त कसाशी खातात? कवितेचं मीटर चुकल्यामुळे तालामध्ये काय गडबड होऊ शकते – या मूलभूत गोष्टीही गीतकार होऊ पाहणाऱ्या उमेदवारांना ठाऊक नसल्यामुळे गीतकार आणि संगीतकारामध्ये जो समन्वय साधला जायला हवा तो साधला जाऊ शकत नाही. (काही 'गीतकार' हे मीटर मध्ये न लिहिता 'किलोमीटर' मध्ये लिहीत असतात हे त्यांचं त्यांना ही ध्यानात येत नाही!) या सगळ्याचे थेट पडसाद त्या गीत-संगीत निर्मितीवर उमटतात.


हा झाला गीतकारांचा प्रश्न. या नाण्याची दुसरी बाजू म्हणजे ज्या संगीतकारांना उत्तम गीत लिहून मिळतं त्यांना त्या गीतामधल्या भाषेचे काही तरल आणि सूक्ष्म भाव कळतात की नाही. 'मराठी संगीत' असं म्हटलं की संगीतकाराची आणि मराठीची मैत्री असावी ही अट अगदी रास्त आहे. ज्या संगीतकाराला गीतामधल्या सूक्ष्म जागा दिसू शकत नाहीत त्याची चाल अतिशय ढोबळ आणि प्राथमिक पातळीची होणार हे ओघाओघानं आलंच.


यावर एक उपाय म्हणजे जुन्या कविता शोधून त्यांना संगीतबद्ध करणं. ती सुद्धा एक गरज आहेच. कुठल्याही अभिजात कलाकृतीचे नवीन अन्वयार्थ नव्या पिढीने लावले तर त्या अभिजात कलाकृतीचे आयुष्य वाढते. पण फक्त एवढच करून आपलं संगीत किती प्रवाही राहू शकेल असा प्रश्न आहे. भावसंगीतामध्ये 'प्रवाही असणं' हा त्याचा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. काळ बदलला, जीवनशैली बदलली, तर भावसंगीतही बदलण्याची गरज असते, नाहीतर हे संगीत अप्रस्तुत वाटू शकतं. मराठी संगीताच्या कार्यक्रमांना गर्दी ही ज्येष्ठ नागरिकांची असते आणि तरूण वर्ग विशेष उपस्थित नसतो त्याचं प्रमुख कारण हे असावं. 'शुक्रतारा मंदवारा' हे गीत किती ही अप्रतीम असलं तरी आजच्या तरूणाला प्रेम करण्यासाठी त्याच्या आयुष्याशी संबंध असलेल्या नवनवीन प्रेमगीतांची निर्मिती होणं केवळ अपरिहार्य आहे. एका वेगळ्या प्रकाराचं उदाहरण द्यायचं म्हणजे – केवळ, सौभद्र, मानापमान, संशयकल्लोळ, किंवा कट्यार काळजात घुसली सादर करून संगीत रंगभूमी जिवंत राहणं कठीण आहे. त्यासाठी संगीत नाटकांच्या परंपरेतीलच, पण एक नवीन नाटक सादर होणंच गरजेचं आहे – ज्याला आजचे संदर्भ असतील.


यातुन आणखी एक प्रश्न निर्माण होतो म्हणजे 'आजचं' मराठी संगीत म्हणजे काय? बऱ्याचदा 'आधुनिक' आणि 'पाश्चात्त्य' यामध्ये गल्लत होण्याची शक्यता असते आणि तशी ती बऱ्याच २१व्या शतकातल्या संगीतकारांची होते देखिल. या निमित्ताने मराठी आधुनिकतेचा शोध घ्यायला हवा. पाश्चात्त्य न होता मराठी idiom मध्येच आधुनिक होता आलं तर मराठी संगीताला अनेक दालनं खुली होतील असा माझा विश्वास आहे.


एका ज्येष्ठ पत्रकाराने मला एकदा कोड्यात टाकणारा प्रश्न विचारला होता. मराठी संगीताचं नेमकं मराठीपण कुठे असतं? काही मराठी संगीतकारांनी दिलेल्या हिंदी गीतांच्या चाली सुद्धा मराठीच वाटतात याकडे त्यांनी माझं लक्ष वेधलं. त्याचीच एक वेगळी बाजू अशी आहे की अलिकडच्या काही मराठी गीतांमध्ये हे मराठीपण अजिबातच आढळून येत नाही. किंवा काही हिंदी चित्रसृष्टीतल्या गायकांनी गायलेली मराठी गाणी हिंदीतूनच गायल्यासारखी वाटतात. यात अनेक वेगवेगळ्या बाबी एकाच वेळी गुंतलेल्या आहेत. गायकाची कहन, त्या प्रदेशाचा भूगोल, समाजव्यवस्थ्या, अशा अनेक गोष्टी आपापला प्रभाव त्या गाण्यावर पाडत असतात. पं. सत्यशील देशपांडे यांनी लोकसंगीतावर केलेल्या एका विवेचनात असं म्हटलं होतं की नेपाळच्या लोकधुना ह्या प्रामुख्याने तारसप्त्कातच वावरणाऱ्या असतात याला त्याचा भूगोल कारणीभूत आहे. उंच बर्फाचे कडे आणि डोंगराळ प्रदेश असल्यामुळे माणूस सहजासहजी दुसऱ्या माणसाच्या दृष्टीस पडत नाही. त्यामुळे 'आवाज' ही एकच आश्वासक गोष्ट असते. ही लोकगीतं एक हाळी किंवा हाक दिल्याप्रमाणे तारसप्तकाच्या काही सुरांमध्ये फिरत राहतात. मराठी संगीताच्या बाबतीत एक सूत्र हाती लागतं – की सोप्यातल्या सोप्या चालींमध्ये सुद्धा एक प्रकारची complexity असते.


आपण २ उदाहरणं घेऊ या. शंकर-जयकिशन यांची एक चाल – 'जाऊँ कहाँ बता ऐ दिल, दुनिया बड़ी है संगदिल -' आणि ह्या गाण्याबरोबर सुधीर फडके यांचं – 'हा माझा मार्ग एकला -' हे गीत घ्या. आता दुसरं उदाहरण अलिकडच्या काळातलं. ए. आर. रेहमान यांच्या 'स्वदेस' चित्रपटातलं 'ये तारा वो तारा' हे गाणं घ्या आणि त्या बरोबर अजय-अतुल यांचं 'मन उधाण वाऱ्याचे' हे गीत घ्या. आपल्या लक्षात येईल की दोन्ही मराठी गाण्यांमधे, काळ बदलून सुद्धा त्या संपूर्ण रचनेत एक complexity आढळते जी वरील दोन्ही हिंदी गाण्यांत आढळत नाही. वरील चारही गाण्यांमधे गोडवा आहे आणि सगळीच गाणी दर्जेदार आहेत पण या दोन मराठी गाण्यांमधली complexity किंवा रचनेतली सूक्ष्मता हीच या गाण्यांच्या मराठीपणाचं एक परिमाण आहे. यात आपल्याला आढळेल की वेगवेगळ्या अंतऱ्यांना वेगवेगळ्या चाली करणं जितकं आपल्याला मराठी संगीतात सापडेल तितक्या सहजासहजी हिंदी गीतांमध्ये नाही सापडणार. हीच complexity बंगाली किंवा कन्नड गीतांमध्ये एका वेगळ्या रूपात आपल्याला ती भेटू शकते. पण मराठी संगीतकारांचा पिंड हा रचनेच्या बाबतीत अधिक सूक्ष्मतेकडे धाव घेणारा आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे. याचं एक कारण मला असं वाटतं की मराठी मन हे academic आहे. एका संगीतकाराबरोबर त्याच्या मनातला एक समीक्षकही समांतरपणे त्या निर्मितीप्रक्रियेत सहभागी असतो.


आज मराठी संगीतकार असणं यात फक्त छान गाणी निर्माण होत आहेत का नाहीत आणि ती लोकांपर्यंत पोचत आहेत की नाहीत या पलिकडेही जाऊन काही इतर गंभीर मुद्दे आहेत. मराठी आणि संगीत, असं दोन्ही आपल्या संगीतातून दिसतंय्‍ की नाही याकडे मराठी संगीतकारांचं लक्ष असायला हवं. भाषेचा अभ्यास नसला तरी किमान भाषेबद्दल आस्था असणं गरजेचं आहे.


मला व्य्कतिश: आजचं चित्र खूपच आशावादी दिसतं. माझ्या बरोबर अनेक समकालीन मराठी संगीतकार आपली वाट शोधायचा एक प्रामाणिक प्रयत्न करताना दिसत आहेत. आपल्या परंपरेचं भान ठेवून प्रयोग करायला बिचकत नाहीयेत्‌. बऱ्याच संगीतकारांना त्यांच्या प्रयोगांमधे यश देखिल मिळू लागलं आहे. संगीतकारांना नवनिर्मितीची ऊर्मी येण्याइतपत आजचं वातावरण अनुकूल होऊ लागलय्‌ (अगदी नवीन संगीतकारांच्या भाषेत नुसतं 'कूल' होऊ लगलंय्‌!!) मराठी चित्रसृष्टी सुद्धा आपल्या कक्षा रुंदावण्याच्या तयारीत आहे. मराठी संगीतामध्ये नवी ऊर्जा यायची असेल तर ती मराठी साहित्य, चित्रपट, नाटक, यातही झिरपण्याची गरज आहे. अजून बरेच मुद्दे आहेत जे माझ्यामदला समीक्षक मांडू पाहतोय, पण तूर्तास एक नवीन चाल सुचतेय्‌, त्याचं काय होतंय्‍ ते पाहतो!


© कौशल श्री. इनामदार, २००७.टीप: वरील लेख ग्रंथालीच्या 'रुची' या मासिकाच्या 'बृहन्महाराष्ट्र सिऍटल अधिवेशन विशेषांक – जुलै २००७' मध्ये छापून आला होता.

Labels: ,