क्षितिज जसें दिसतें…

क्षितिज जसें दिसतें


तशी म्हणावी गाणीं…


ग्रेसांचं लिखाण मला नेहमी गूढ वाटत आलं आहे, पण अनाकलनीय कधीच नाही. कविता 'कळली' नाही तरी जाणीवेच्या पातळीवर त्यांच्या कविता आपला परिणाम साधतात असं मला नेहमी वाटत आलं आहे. माझी पहिली मराठीतली चाल ग्रेसांच्या कवितेला लागली यांचं मला आता दहा वर्षांनंतर अजिबातच नवल वाटत नाही. ती कविता होती 'पाऊस कधीचा पडतो'. चाल लागण्याची क्रिया ही ग्रेसांच्या कवितेइतकीच गूढ होती असं म्हणायला हरकत नाही.


मी, त्या काळी, रूपारेल कॉलेज मधे होतो… नाटकाने झपाटलेला. नाटकाच्या निमित्ताने संगीतामधल्या काही लोकांशी संबंध आला होता. त्यात कमलेश भडकमकर, अजित परब, ओंकार दादरकर, तनुजा जोग, शिल्पा पै ही सगळी मंडळी होती. मग नाटक सोडून आम्ही इतर ही बराच वेळ एकत्र घालवायचो. असंच एकदा रूपारेलच्या कँटीन मधे बसून कमलेश भडकमकर आणि मी चहा पीत होतो. आणि मी सहज गुणगुणलो…


"पाऊस कधीचा पडतो


झाडांची हलती पानें


हलकेच जाग मज आली


दु:खाच्या मंद सुराने…"


कमलेशचे कान टवकारले.


"हे काय गातोय्‍स?" त्याने विचारलं.


"माहित नाही," मी उत्तरलो, "गाणं आहे… बऱ्यापैकी लोकप्रिय आहे ना? मला या दोनच ओळी माहित आहेत."


कमलेश म्हणाला, "शब्द बरोबर आहेत… पण चाल चुकीची गातोय्‍स. यशवंत देवांची चाल आहे याला."


त्याने मला यशवंत देवांची चाल ऐकवली. मग तो पुढे म्हणाला –


"पण तू गात होतास ते ही चांगलं लागत होतं… तू पुढे करत का नाहीस ही चाल?"


मी घरी जाऊन माझ्या वडिलांच्या संग्रहातलं 'संध्याकाळच्या कविता' हे पुस्तक काढलं आणि या कवितेला चाल दिली. ती सुरावट कशी सुचली, अजून मला कळलेलं नाही. मला अजून ही वाटतंय‍्‍ की मी ती कुठेतरी, कधीतरी ऐकली असावी. असो. पण त्या मुळे मी एक मराठी संगीतकार झालो एवढं मात्र खरं. ती चाल माझ्या मित्रांना, घरच्या लोकांना ऐकवली आणि सगळ्यांनीच मला प्रोत्सान दिलं. माझ्या वडिलांनी मला या चाली निमित्त विल्यम गोल्डिंगचं 'लॉर्ड ऑफ द फ्लाइज' हे पुस्तक ही भेट दिलं. आणि त्यानंतर झपाटल्यासारखं मी कवितांना चाली देत सुटलो.


पुढे काही दिवसांनी याच पुस्तकाची प्रस्तावना असावी अशी कविता – 'क्षितिज जसें दिसतें तशी म्हणावी गाणी' – याला देखिल मी चाल लावली. कविता वाचली तेव्हा त्याचा अर्थ काहीच कळेना. यशवंत देवांचं म्हणणं असतं की कविता कळल्या शिवाय त्याला चाल देऊ नये. त्या निकषावर तर इथे कठीण होतं! पण मी कविता न कळताच चाल द्यायला सुरुवात केली आणि मला एक नवा अनुभव आला. तो असा की गाता गाता ती कविता मला उलगडत होती. 'क्षितिज जसें दिसतें तशी म्हणावी गाणी' या ओळीचा अर्थ मला कळत नव्हता पण हळूहळू उलगडत होता. आपल्याला आपल्या खिडकीतून जसं आणि जितकं क्षितिज दिसतं तशी गाणी म्हणावी असा थोडासा भाबडा पण खरा वाटणारा अर्थ मला कळला होता. त्यानंतर काही वर्षे गेली आणि एके दिवशी खुद्द ग्रेस यांचाच मला फोन आला.


"माझ्या कवितांना तुम्ही छान चाली दिल्या आहेत असं मी ऐकलं, तेव्हा मला त्या ऐकण्याची इच्छा आहे." – इति ग्रेस.


मला आनंद, भय, काळजी (स्वत:ची), हुरहूर, अशा विविध भावना एका वेळी अनुभवायला मिळाल्या. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे खरोखरच ते संध्याकाळी माझ्या घरी येऊन ठेपले. घरी मित्रांची दाटी झाली होती ग्रेसना पहाण्यासाठी. ग्रेस काय बोलतायत‍्‍ याकडे सर्वांचं लक्ष होतं.


माझी सगळी गाणी शांतपणे ऐकून घेतली आणि म्हणाले:


"खरोखरच चांगल्या चाली दिल्यात की तुम्ही. यातली 'विराट घुमटातुनी' ची चाल तुम्ही मला रेकॉर्ड करून द्या."


मग ते आपणहून त्यांच्या कवितांबद्दल बोलू लागले आणि जमलेले सर्व चाहते त्या बोलण्यात रंगून गेले. पुढे चर्चा त्यांच्यावर होणाऱ्या 'दुर्बोधते'च्या आरोपावर गेली. त्यावर ते म्हणाले:


"काय दुर्बोध वाटतं माझ्या लेखनात? आणि तुम्हाला ग्रेस दुर्बोध वाटतो तर काय ज्ञानेश्वर सुबोध वाटतो? 'क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी' यात काय दुर्बोध आहे?"


त्यांनी ती म्हणताक्षणी मला ती ओळ स्पष्ट दिसू लागली. खरंच्‍, यात आपल्याला काय वाटलं जे कळलं नाही? का इतकं साधं आपल्या लक्षात आलं नाही? त्यांनी ती ओळ उच्चारल्यावर आणखी ही काही संदर्भ स्पष्ट झाले. या ओळी मधे आपलं गाणं आपल्या दृष्टीशी आणि अंतर्दृष्टीशी प्रामाणिक असावं असा ही संकेत होता. एका क्षणातच मला माझ्या कलेकडे पहाण्याचा एक दृ्ष्टिकोन मिळाल्यासारखं वाटलं. खरं तर याच अर्थाचं पण यापेक्षा थोडं ढोबळ आणि (पाडगांवकरांच्या चाहत्यांची माफी मागून – ज्यात माझा ही समावेश आहे) थोडं कमी aesthetic विधान मंगेश पाडगांवकरांनी ही आपल्या कवितेमधून केलं होतं.


गाण्यात सर्व माझ्या माझे इमान आहे


ज्याचे खरे न गाणे तो बेइमान आहे.


मंगेश पाडगांवरांच्या ओळीं मधून कलेविषयी एका ठराविक मूल्याबद्दल माहिती मिळते किंवा पाडगांवकरांचं त्याविषयीचं मत कळतं. पण ग्रेस यांच्या ओळींमधून कलेविषयीच्या याच मूल्याबद्दल एक अंतर्दृष्टी मिळते. ग्रेस यांच्या ओळीमध्ये अनेक शक्यता दडल्या आहेत आणि म्हणूनच त्यांच्या कवितेमधे उलगडत रहाण्याची क्वॉलिटी आहे. आज ही या ओळी वेगवेगळ्या रूपात माझ्यासमोर येतच राहतात, आणि स्वत:ला उलगडत राहतात. आणि क्षितिज अधिकाधिक रुंद होत जातं…


© कौशल श्री. इनामदार, २००७.

Labels: , ,