एका चालीची गोष्ट

कुठल्या ही संगीतकाराला 'हे तुम्हाला कसं सुचतं हो?' या प्रश्नाला आयुष्यात कधी न कधीतरी सामोरं जावच लागतं. बहुतेक वेळा या प्रश्नाचं उत्तर त्या संगीतकाराकडे तयार नसतं आणि मग तो 'यात माझं काही नाही.... ही परमेश्वराची कृपा आहे...' किंवा या सारखं काही विनयशील असं उत्तर देऊन मोकळा होतो. मला नेहमी वाटतं की आपल्याला कधी कधी इतकं सुचतं... काही बरं, काही चांगलं, काही सामान्य आणि काही वाईट... आणि बराच काळ असा ही जातो की ज्या काळात काही सुचत देखिल नाही. तर या सगळ्याची जबाबदारी उगीचच त्या विधात्यावर का बरं ढकलावी?! आपल्या सामान्य आणि वाईट चालींची ही जबाबदारी त्याच्यावर लादणं जरा अन्यायकारकच नाही का?


पण विचार केला तर हा प्रश्न खरच अस्वस्थ करणारा आहे. एखादी चाल नेमकी कशी सुचते? काहीच अस्तित्वात नसतं आणि अचानक अवकाशाच्या पटावर सूर उमटतात आणि एक स्वरचित्र तयार होतं. पण हे सगळं खरंच इतकं अद्भुत आहे का? आपल्याच मनात घडणारी सृजनाची प्रक्रिया आपल्याला नेमकी कळू नये हे मनाला पटत नाही आणि आपण त्या चालीचा मूळ स्रोत शोधण्याच्या यात्रेवर निघतो.


देखो तो ख़ुदाई भी छोटी सी चीज़ है।


सोचो तो साँस लेना भी हैरत की बात है॥


या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर ते या सृजानाच्या क्षणांइतकंच सुख देऊन जातं याचा मला अनुभव आहे. अशा काही क्षणांचा अनुभव तुमच्याबरोबर शेअर करायला मला आवडेल.


ग्रेस यांची 'या व्याकुळ संध्यासमयीं...' या कवितेला चाल देण्याचा योग आला. कविता वाचली आणि मी भांबावुन गेलो.


या व्याकुळ संध्यासमयीं


शब्दांचा जीव वितळतो


डोळ्यांत कुणाच्या क्षितिजे


मी अपुले हात उजळतो


पं. यशवंत देव म्हणतात की कविता समजल्या शिवाय चाल देऊ नये. या निकषावर तर इथे कठीण होतं! पण कविता कळली नसली तरी ती जाणिवेच्या पातळीवर आपला परिणाम साधत होती. डोळ्यापुढे एक चित्र उभं राहिलं, एक वातावरण मनात तयार झालं. शब्दातून थोडी हूरहूर जाणवत होती. मला पहिल्या ओळीची चाल सुचली. ती अहिर भैरव रागाच्या सुरावटीच्या आसपास घोटाळत होती. 'डोळ्यांत कुणाच्या क्षितिजे' म्हणताना मी आपसूक वरचा 'सा' लावला. पूर्ण चाल झाल्यावर माझ्या मनातली हूरहूर वाढली होती, ती गूढ, अनामिक बेचैनी अधिक तीव्रपणे गाण्यामधे जाणवत होती.


मी विचार करू लागलो. ही चाल मला अशीच का सुचली असेल? संध्याकाळचं गीत होतं – पण ते वाचत असताना ही माझ्या मनात अहिर भैरवची सुरावट का रूंजी घालत होती? अहिर भैरव हा पहाटे गायचा राग असून सुद्धा?


मला आठवलं की एकदा मी आजारी होतो आणि जो रात्री झोपलो तो दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जाग आली. संधिप्रकाश होता आणि मला कळेना आता उजाडणार आहे का अंधारणार आहे. त्या क्षणांपुरता राहिलेला जो संभ्रम आणि गूढ अशी अस्वस्थता त्या अहिर भैरवच्या सुरांतुन व्यक्त होत होती. बेचैनी होती पण ती अनामिक होती, त्यावर सहज बोट ठेवता येत नव्हतं. कदाचित चालीमधे मारव्याचे सूर डोकावणं जास्त स्वाभाविक झालं असतं, बेचैनी ही जाणवली असती पण ती गूढ आणि सहजासहजी न उलगडणारी वाटली नसती. आणि सकाळचे राग संध्याकाळी ऐकताना मला कायम ही अनामिक बेचैनी जाणवत आली आहे.


'रेन रागा' नावाचा एक फ्युजन शो मी केला होता. त्यामधे पाऊस पडायच्या अगोदरचं चित्र एका धुनेतून व्यक्त करायचं होतं. पाचच मिनिटात चाल लागली. नंतर विचार केला तेव्हा लक्षात आलं की पाऊस पडायच्या अगोदरचं चित्र – असा विचार करताना आपल्या डोळ्यासमोर हे चित्र उभं राहिलं होतं... खडकाळ प्रदेश आहे... सूर्य मध्यान्हीला आलाय... लो ऍन्गल कॅमेऱ्यातुन तो आपल्याला दिसतोय... घामाच्या धारा वाहत आहेत. आणि हेमा मालिनी काचांच्या तुकड्यांवर नाचते आहे ! त्याबरोबरच सूर्य मध्यान्हीला आलाय.... असं जेव्हा आपल्या डोक्यात आलं तेव्हा आपल्याला पं. कुमार गंधर्वांनी निर्माण केलेल्या 'मधसुरजा' या रागाची ही आठवण झाली होती.


.... आणि आपण केलेल्या चालीवर या दोन्ही सुरावटींची छाया होती. हे आपसूक घडलं होतं. त्याचा विचार चाल देण्याच्या आधी झाला नव्हता.


असा तर्क करा. तुम्ही पावसाळ्यात कोकणात फिरायला गेले आहात. संध्याकाळ होते. तुम्हाला चहाची तल्लफ येते. तुम्हाला रस्त्यावर एक चहाची टपरी दिसते. तुम्ही गाडीतून उतरता आणि अचानक एक जोराची सर येते. तुम्ही भिजत भिजत टपरी पर्यंत जाता. शेगडीवर एक अनुभवी पातेलं आहे ज्यावर चहाचं आधण चढवलं आहे. त्यातून मस्त, गरम वाफा येत आहेत. समोर संधिप्रकाशात एक कौलारू घर दिसतंय्‍. त्यात एक कंदील पेटलाय. संपूर्ण परिसर अतिशय रम्य दिसतोय्‍. तुम्ही तो डोळ्यांत साठवून घेताय. आणि त्याच वेळी त्या चहाच्या टपरीवरचा जो रेडियो आहे, त्या मधे विविधभारती वर 'फिरकीवाली तू कल फिर आना, नहीं फिर जाना तू अपने जबान से... कि तेरे नैना है जरा बईमान से...' खरं तर त्या गाण्याचा आणि त्या दृश्याचा काडीचा संबंध नसतो पण ते गाणं त्या दृश्याचा एक घटक बनून जातं.


बराच काळ उलटतो आणि तुमच्यावर एका पावसातल्या गीताला चाल देण्याची वेळ येते. तेव्हा आपसूक 'फिरकीवाली...' चे सूर तुमच्या सुरावटीमधे मिसळून जातात!


एका अर्थाने आपण नवीन काहीच करत नसतो. मार्क ट्वेन ने म्हटलय्‍ –


"Only Adam, when he said a good thing, knew that nobody had said it before him!"


पण तरीही वेगवेगळ्या चाली निर्माण होतच रहातात. आपल्याला त्यातलं नाविन्य जाणवत राहतं. घराघरात मटकीची उसळ होते पण चव सगळीकडची वेगळी असते कारण त्या गृहिणीच्या हाताची (काही सुखी कुटुंबांमध्ये गृहस्थाच्या!) चव त्यामधे उतरते. तसंच एखद्या गीताची चाल ही आपल्या संस्कारातून आली असेल पण आपल्या व्यक्तिमत्वाचा स्पर्श तिला होतो आणि चाल नवीन होऊन जाते !


© कौशल श्री. इनामदार


हा लेख 'प्रहार' या दैनिकात ११ ऑक्टोबर २००८ रोजी छापून आला होता

Labels: , , ,