शंकरराव बिनीवाले: एका सिंदबादची कहाणी

काही वर्षांपूर्वी मी माणिक वर्मांच्या घरी गेलो होतो. शांताबाई शेळकेंच्या कवितांना स्वरबद्ध करून 'शुभ्र कळ्या मूठभर' नावाचा एक अल्बम मी केला होता आणि माझी अशी तीव्र इच्छा होती की त्याचं प्रकाशन माणिक वर्मांच्या हस्ते व्हावं. माणिकबाईंनी अतिशय आस्थेने त्या अल्बम मधली सर्व गाणी ऐकली आणि अतिशय प्रेमाने येण्याचं कबूल केलं.

"गोड आहेत चाली." त्या म्हणाल्या. "तुझ्या घरामध्ये संगीत आहे का?" त्यांनी प्रश्न केला.

"माझे आजोबा व्हायोलीन वाजवायचे." मी उत्तर दिलं. "पुण्यात होते."

"आमच्या काळात पुण्यात एक व्हायोलीन वादक होते. क्लासिकल आणि लाइट असं दोन्ही छान वाजवायचे. अतिशय गोड हात होता. शंकरराव बिनीवाले त्यांचं नाव."

माझा ऊर अभिमानाने भरून आला. माणिकबाईंनी नेमकं हेच नाव घ्यावं हा अनोखा योगायोग होता.

"मी त्यांचाच नातू." मी म्हणालो.

माझे आजोबा – शंकरराव बिनीवाले (आम्ही त्यांना अप्पासाहेब म्हणत असू) हे काळाच्या पडद्याआड जाऊन आता १४ वर्ष झाली. आणि १४ वर्षांपूर्वीच मी संगीत क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं – मी दिलेल्या पहिल्या चालीच्या रूपानं. माझ्या संगीतामधल्या वाटचाली मध्ये प्रत्येक क्षणाला मला त्यांची आठवण झाल्या शिवाय राहत नाही. आज मला राहून राहून वाटतं की एक संगीतकार म्हणून त्यांचा मला सहवास आणखी जास्त काळ लाभला असता तर मी अधिक श्रीमंत झालो असतो.

अप्पासाहेब अतिशय अबोल होते. स्वत:बद्दल तर ते क्वचितच बोलायचे. हेच एक कारण आहे की आज ही मला ते एका जिग्सॉ पझल सारखे उलगडत जाताहेत. अगदी आजही त्यांचा एक जुना फोटो, किंवा त्यांच्याबद्दल एखादं जुनं वर्तमानपत्रामधलं कात्रण त्यांच्याबद्दल काहीतरी नवीन सांगून जातं. आणि त्यांच्याबद्दल प्रत्येक नवीन कळणारी गोष्ट अचंबित करणारी असते.

त्यांच्याबद्दल माझ्या सगळ्या आठवणी त्यांच्या पुण्यातल्या केसरी वाड्याच्या समोरच्या २, नारायण पेठ या निवासस्थानाशी जोडल्या आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी आणि माझा भाऊ, विशाल, आजोळी राह्यला जात असू. वाड्याच्या दरवाज्यातून आत शिरताच आम्हाला काकी (म्हणजे आमची आजी) आणि अप्पासाहेब दारात आमची वाट पाहतांना दिसले नाहीत, असं माझ्यातरी काही स्मरणात नाही. आम्ही दिसताच काकी लगबगीने घराच्या दारात लावलेल्या अळूची पानं काढायची आणि अळुवड्या करायला घ्यायची. अप्पासाहेब 'आलात का?' असं म्हणत स्वागत करायचे.

अप्पासाहेब अबोल असले तरी नातवंडांना गोष्ट सांगताना त्यांना स्वत:च्या अबोल स्वभावाचा विसर पडत असावा. अरेबियन नाईट्स मधल्या कथा तर ते इतके रंगवून सांगत की आमच्या डोळ्यासमोर ते सगळं वातावरण उभं होत असे. त्यांची एक लाडकी कथा म्हणजे 'सिंदबादच्या सात सफरी'. आम्ही जितके ऐकताना रंगून जायचो तितकेच ते सांगताना त्यात हरवून जायचे. मोठा झाल्यावर मी सिंदबादची कथा नव्याने पुस्तकात वाचली पण ती मजा कधीच आली नाही.

रात्री गोष्ट ऐकता ऐकता आम्हाला गुंगी यायची. अप्पासाहेब मात्र रात्री झोपत नसत. त्यांच्या तक्क्याच्या वरती ४-५ जर्मन व्हायोलीन्स्‍ लावून ठेवली असायची... आणि एक त्यांचं लाडकं व्हायोलीन त्यांच्या शेजारी असायचं. आम्ही अंथरुणात शिरलो की ते आपल्या व्हायोलीनच्या ब्रिजला 'म्यूट' लावत असत, ज्याने व्हायोलीनचा आवाज अगदी मंद होऊन जाई आणि मग रात्रभर ते रियाज करत. त्यांच्या व्हायोलीनचे सूर आम्हाला अलगद झोपेच्या कुशीत नेऊन ठेवायचे.

आता इतक्या वर्षांनी मला जाणीव होतेय की अप्पासाहेबांच्या गोष्टीतला सिंदबाद हे ते स्वत:च होते.

***

१९३३.

'कॉन्टे रोस्सो' नावाचं एक जहाज ऑस्ट्रेलियाहून इंग्लंडच्या दिशेने प्रवास करत होतं. मुंबई बंदरावर हे जहाज लागलं आणि त्या जहाजावर २४ वर्षांचा एक तरूण चढला. त्याच्या हातामध्ये एक व्हायोलीनची केस होती. या तरूणाची इच्छा होती, की त्याच्या हातामधलं वाद्य जगाच्या ज्या कोपऱ्यातून आलंय तिथे जाऊन त्याच्याबद्दलचं ज्ञान मिळवावं, तिथेच जाऊन ते वाद्य शिकावं. या तरूणाचं नाव होतं – शंकर गोपाळ बिनीवाले.

अप्पासाहेबांचा जन्म पुण्यातल्या सरदार बिनीवालेंच्या घराण्यातला. विसाजी कृष्ण बिनीवालेंच्या नवव्या पिढी पर्यंत पेशवेकालीन आब संपला होता. वडील लवकर गेल्यानंतर थोरले बंधु बाबासाहेब, यांच्या सल्ल्याने घरातल्याच सराफीचा व्यवसाय अप्पासाहेब पहायला लागले. पण त्यात त्यांचं मन रमेना. एके दिवशी अप्पासाहेबांना घरातल्या अडगळीत एक व्हायोलीन सापडलं. काही वर्षांपूर्वी बाबासाहेबांनीच ते खरेदी केलं होतं. अप्पासाहेबांची बोटं त्यावरून फिरायला लागली. घरातल्या मोठ्यांचा धाक वाटण्याचा तो काळ. कुणाला कळू नये म्हणून अप्पासाहेब वाड्यातल्या त्यांच्या वरच्या खोलीत व्हायोलीन वाजवत बसायचे. कुणीही न शिकवता हळू हळू आपल्याच बुद्धीने ते वाद्य आत्मसात करू लागले. मग एके दिवशी बाबासाहेबांनी त्यांचं व्हायोलीन ऐकलं आणि ते चकित झाले. कुणीही न शिकवता अप्पासाहेब उत्तमच व्हायोलीन वाजवू लागले होते. बाबासाहेब त्यांना गजाननबुवा जोशींकडे घेऊन गेले.

गजाननबुवांनी अप्पासाहेबांचं व्हायोलीन ऐकलं आणि इतके प्रभावित झाले की म्हणाले, "तुम्ही माझ्याबरोबर भारत गायन समाजात शिकवायला चला."

पुढे गजाननबुवांनी अप्पासाहेबांना औंधला बोलावून घेतले. औंधचे राजे बाळासाहेब पंतप्रतिनिधी हे कीर्तनकार होते. अप्पासाहेब त्यांना साथ करू लागले. सहा महीने अप्पासाहेबांनी औंध मध्ये काढल्यानंतर ते पुण्यात परतले.

पुण्यामध्ये कृष्णा थिएटर मध्ये त्या काळात मूकपट लागत असत. तिथे अप्पासाहेब या मूकपटांना पार्श्वसंगीत देऊ लागले. हळुहळू त्यांची व्हायोलीनवादक म्हणून ख्याती पसरू लागली. काही लोक अप्पासाहेबांचं वादन ऐकण्याकरिता एक चित्रपट २ – ३ वेळा पाहू लागले.

मग प्रभात फिल्म कंपनीने 'अयोध्येचा राजा' हा बोलपट बनवायचं ठरवलं. संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी गोविंदराव टेंबे यांच्यावर सोपवली. गोविंदरावांनी अप्पासाहेबांना बोलावून घेतलं. 'अयोध्येचा राजा' या चित्रपटात जे व्हायोलीन आपल्याला ऐकू येतं ते अप्पासाहेबांनी वाजवलं आहे.

पण अप्पासाहेबांमधला सिंदबाद त्यांना स्वस्थ बसू देईना. पाश्चात्य देशांमध्ये भारतीय संगीताचा प्रसार करावा आणि त्याच वेळी आपण स्वत: पाश्चात्य संगीत आत्मसात करावं अशी तीव्र इच्छा त्यांच्या मनात मूळ धरून राहिली. प्रभातच्या नोकरीमधून आणि काही कार्यक्रमातून साठलेली जी काही जमापूंजी होती, त्यामधून त्यांनी 'कॉन्टे रोस्सो' जहाजाचं तिकीट काढलं.

अप्पासाहेब जहाजामध्ये बसले तेव्हा मनात हेतू पक्का असला तरी युरोपमध्ये उतरल्यावर आपण नक्की कुठे जाणार आहोत हे पक्कं नव्हतं. पण योगायोग असा की ऑस्ट्रेलियाचा दौरा आटपून मायदेशी परत निघालेला एक इटालियन व्हायोलीनवादक, फेदेदेन्ये मारियानो, याच जहाजावर होता. एके दिवशी अप्पासाहेब आपल्या केबिनमध्ये रियाज करत असताना त्याने ऐकले आणि त्याने त्यांची चौकशी केली. त्यांच्या वादनाने तो चांगलाच प्रभावित झाला होता. तो म्हणाला – "तुम्ही माझ्याबरोबर इटलीला चला. माझ्या घरीच रहा. तुम्ही मला भारतीय संगीत शिकवा, मी तुम्हाला पाश्चात्य संगीत शिकवतो."

मारियानो इटली आणि फ्रान्सच्या सीमेवर असलेल्या व्हेन्तेमिलिया नावाच्या एका छोट्या गावात रहायचा. तो अप्पासाहेबांना आपल्यासोबत तिथे घेऊन गेला. सहा महिने अप्पासाहेब इटलीमध्ये राहिले आणि मारियानोकडे त्यांनी पाश्चात्त्य संगीताचे धडे घेतले. त्याच दरम्यान ते युरोपात भारतीय संगीताचे कार्यक्रम करू लागले. त्यांचं नाव आणि कीर्ति काही काळातच पसरली आणि मुसोलिनी – इटलीचा हुकुमशहा – याने अप्पासाहेबांना नेपल्सला आपल्या राजवाड्यात भेटीसाठी बोलावलं. त्या काळात मुसोलिनीची भेट म्हणजे जास्तीत जास्त ५-१० मिनिटं. पण अप्पासाहेबांशी चर्चेत मुसोलिनी चांगलाच रंगला आणि त्यांची भेट पाऊण तास रंगली. अप्पासाहेबांनी मुसोलिनीला नाट्यसंगीत आणि रागसंगीत असं दोन्ही या भेटीत वाजवून दाखवलं!

तिथून पुढे अप्पासाहेबांनी युरोपभरात अनेक कार्यक्रम केले. इटली मध्ये, फ्रान्सच्या कॅसिनो द पारी या प्रतिष्ठित थिएटर मध्ये, हॉलन्ड मध्ये, आणि इंग्लंड मध्ये. इंग्लंडमध्ये बी.बी.सी. वर सोलो व्हायोलीनचा कार्यक्रम करणारे अप्पासाहेब पहिले भारतीय कलावंत होते. लन्डन टाइम्स्‍, संडे रेफ़्री, अशा अनेक ब्रिटिश वर्तमानपत्रांतून अप्पासाहेबांबद्दल छापून येऊ लागलं. एका डच वर्तमानपत्राने तर अप्पासाहेबांना 'ब्रिटिश-इंडियाचा येहुदी मेन्युहिन' म्हणून संबोधलंय!

युरोपहून परतल्यानंतर या मितभाषी कलाकाराने आपल्या दौऱ्याच्या गौरवगाथा कुणाजवळ ही सांगितल्या नाहीत. आम्हाला ही त्यांच्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी खूप नंतर (काही गोष्टी त्यांच्या मृत्यूनंतर) समजल्या. परतल्यावर अप्पासाहेबांनी भालजी पेंढारकर आणि मो. ग. रांगणेकर या सारख्या दिग्दर्शकांच्या संस्थांमधून नोकरी केली. भालजी पेंढरकरांच्या 'सावित्री' या चित्रपटामध्ये व्हायोलीन हे अप्पासाहेबांनी वाजवलं आहे. रांगणेकरांच्या नाट्यनिकेतन या संस्थेत ही त्यांनी राधामाई, कुलवधु सारख्या नाटकांमध्ये व्हायोलीनची साथ केली. या खेरीज विनायकबुवा पटवर्धन, पंडितराव नगरकर, जगन्नाथबुवा पंढरपूरकर, सुलोचना पालकर, शांता आपटे, ज्योत्सनाबाई भोळे, शाहु मोडक, अशा गायकांना साथ करत असत. याच काळात त्यांचे स्वतंत्र कार्यक्रमही होऊ लागले होते. काही काळ त्यांनी मुंबईत ऑल इंडिया रेडियो आणि 'यंग इंडिया' ग्रामोफोन कंपनीतही नोकरी केली.

अखेर त्यांनी सगळ्या नोकऱ्यांना रामराम ठोकला आणि पुण्याला २, नारायण पेठ च्या आपल्या राहत्या घरात व्हायोलीन वादनाचा क्लास सुरू केला. माझ्या लहानपणीपर्यंत हा क्लास चालू असल्याचं माझ्या स्मरणात आहे. कित्येक वेळा क्लासनंतर काही विद्यार्थी मागे राहून काकीशी (माझ्या आजीशी) गप्पा मारत बसायचे. जितके अप्पासाहेब अबोल तितकीच काकी बोलघेवडी होती. तरीही अप्पासाहेबांशी गप्पा मारायला येण्याऱ्यांची संख्या काही कमी नव्हती. भा. द. खेर (काकीचे बंधू) यांच्यासारख्या पत्रकार – साहित्यिकांपासून प्रताप मुळीकांसारख्या चित्रकारांपर्यंत अनेक लोक अप्पासाहेबांच्या मित्रपरिवारात होते हे मी प्रत्यक्ष अनुभवलं आहे.

अप्पासाहेबांची विनोदबुद्धीही अतिशय तल्लख होती. क्वचितच कधी ते जुन्या गोष्टी सांगण्याच्या मूड मध्ये यायचे तेव्हां आम्हाला या विनोदबुद्धीची एक झलक मिळायची. 'सावित्री' चित्रपटाच्या चित्रीकरणाचं त्यांनी केलेलं वर्णन आठवलं की अजून मला हसू येतं. त्याकाळात प्लेबॅक पद्धत नव्हती. नटच गायचे आणि वादक ही कॅमेऱ्याच्या मागे, किंवा सेटवरच्या झाडाझुडुपात लपून आपआपली वाद्य वाजवायचे. तसे वादक ही ईन मीन तीन! तबला, ऑर्गन आणि व्हायोलीन! अप्पासाहेब सावित्रीची कथा सांगताना म्हणायचे –

"...मग यम सत्यवानाला त्याच्याबरोबर घेऊन जायचा. म्हणजे यम... त्याच्या मागे सत्यवान.... सत्यवानामागे सावित्री, सावित्रीमागे व्हायोलीन, व्हायोलीनमागे तबला.... तबल्यामागे ऑर्गन... अशी ती यात्रा निघे... आणि त्याच्या तालमी, टेक्स्‍ आणि रीटेक्स्‍!"

अप्पासाहेब कलाकार म्हणून जितके श्रेष्ठ होते, तितकेच अवलिया होते. लंडनमध्ये असताना प्रयोग म्हणून एक रेकॉर्ड त्यांनी केली होती. त्या रेकॉर्ड मध्ये एका बाजूला त्यांच्या व्हायोलीनवादनाचा कार्यक्रम तर दुसऱ्या बाजूला त्यांनी त्यांच्या आईला डिक्टेट केलेलं एक पत्र होतं! पण भारतात आल्यानंतर –

"माझी अजून साधना व्हायची आहे- " असं कारण सांगून त्यांनी आपलं एकही ध्वनिमुद्रण होऊ दिलं नाही.

काकी – अप्पासाहेबांचं लग्न झालं तेव्हा काकी पंधरा वर्षांची होती. अप्पासाहेबांनी आधी काय केलं असेल तर तिला तबल्यावर सगळे ठेके धरायला शिकवलं! त्या काळात असं करणं म्हणजे मोठं धाडस आणि बंडखोरीच होती!

काकी आणि अप्पासाहेब
काकी आणि अप्पासाहेब



काकी आणि अप्पासाहेबांचा संसार हा अप्पासाहेबांसारखाच अबोल होता. कधी कधी दिवसभरात ते एकमेकांशी एखादं वाक्यच बोलायचे! आम्हाला याची फार गंमत वाटे. माझा भाऊ, विशाल, खूप लहान असतांना न राहून त्याने काकीला प्रश्न केला.


"तुझं आणि अप्पासाहेबांचं पटत नाही का? तुम्ही एकमेकांशी काही सुद्धा बोलत नाही!"

नंतर नंतर आम्हाला त्यांच्या नि:शब्द संवादातलं प्रेम कळायला लागलं.

१९९४ साली आषाढी एकादशीला काकी गेली आणि त्यानंतर मात्र अप्पासाहेब खचले. जीवनात रस उरला नाही. काही वर्षांपूर्वी फेशियल पॅरलिसिसच्या झटक्यामुळे त्यांचं रात्रभराचं व्हायोलीनवादन बंद झालं होतं. पण संगीत हा त्यांच्या रोजच्या आयुष्यातला भाग राहिलाच होता. खूप संगीत ऐकयचे. पण काकी गेल्यानंतर संगीतही त्यांना नकोसं व्हायचं. काकीचं वर्षश्राद्ध झालं आणि अप्पासाहेबही आठवड्याभरातच गेले.

मला अप्पासाहेबांची ही सगळी रूपं आठवतात. मितभाषी, अबोल, खूप रंगवून अलिबाबा – सिंदबादच्या गोष्टी सांगणारे, रात्रभर म्यूट लावून व्हायोलीन वाजवणारे... मी त्यांचं व्हायोलीन झोपेतच खूप ऐकलं आहे. त्यामुळे त्यांचे सूर माझ्या अंतर्मनात भिनले आहेत. सकाळी सकाळी जाग यायची तेव्हां अप्पासाहेबांची भैरवी चालली असायची. आज ही कधीतरी अचानक पहाटे जाग येते आणि अप्पासाहेबांच्या व्हायोलीनचे सूर मला ऐकू येतात. अगदी ते समोर बसून वाजवत आहेत असा भास होतो. ते सूर मनात रेंगाळत राहतात आणि मी ही सिंदबाद सारखा सात सुरांच्या सफरीवर निघतो!

कौशल श्री. इनामदार

http://kaushalsinamdar.com

http://musicandnoise.blogspot.com

http://ksinamdar.wordpress.com



Labels: , , , , , , ,