मराठी अभिमान गीतामध्ये २०० लोकांच्या समूहाचे ध्वनिमुद्रण


मुंबईच्या एकाही व्यावसायिक रेडियोवाहिनीवर एकही मराठी गाणं लागत नाही. कारण विचारलं की कळतं की ही त्या रेडियोवाहिनीची 'पॉलिसी' असते! भारताच्या इतर कुठल्याही शहरात नसलेली ही 'पॉलिसी' फक्त आणि फक्त मुंबईतच पाळली जाते. उदा. चेन्नईमध्ये तमिळ गाणी न लावण्याची 'पॉलिसी' - आहे का? नाही! जरा अजून खोलात शिरून विचारलं की कळतं की या रेडियोवाहिनीवर असणाऱ्या थोरल्या अधिकाऱ्यांचं मत असतं की मराठी गाणी आपल्या वाहिनीवर लावली तर आपल्या वाहिनीला 'डाउनमार्केट' म्हटलं जाईल!

वरील दिलेल्या माहितीने आपण उद्विग्न होत असाल आणि आपण बऱ्यापैकी सुरात किंवा अप्रतिम सुरेल गात असाल तर मराठी अभिमानगीतामध्ये सूर मिसळून मराठी भाषेत तयार होणाऱ्या जगातील या सर्वात भव्य गाण्यामध्ये आपलं योगदान नोंदवावं.

मराठी भाषेला तिच्याच भूमीत मिळणाऱ्या सावत्र वागणुकीमुळे अस्वस्थ झालेल्या कौशल इनामदार या संगीतकाराला मराठीच्या अभिमान गीताची गरज जाणवली. सुरेश भट यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात लिहिलेल्या 'लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी' या गीताला चाल देऊन ते इतक्या भव्य प्रमाणात ध्वनिमुद्रित करायचं ठरवलं की पुन्हा मराठी 'डाउनमार्केट' आहे म्हणण्याची कुणाची हिंमत होऊ नये. विशेषत: मराठी लोकांमध्येच त्यांच्या भाषेबद्दल न्यूनगंड राहू नये.

४ शहरांमध्ये ध्वनिमुद्रित होत असलेलं आणि १००हून अधिक प्रस्थापित गायकांनी गायलेलं हे गाणं आता पूर्णत्वाच्या वाटेवर आहे. या ध्वनिमुद्रणाचा शेवटचा टप्पा म्हणून दि. ५ नोव्हेंबर रोजी नरीमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण केंद्राच्या सभागृहात सकाळी ११ वाजता या गीतामध्ये २००हून अधिक गायकांचं एकत्र ध्वनिमुद्रण होणार आहे.

"ज्यांना सुरात गाता येतं अशांनी आपल्या आयुष्यातला कामकाजाचा एक दिवस मराठीसाठी देऊन या गीतामध्ये आपलं योगदान द्यावं आणि या ध्वनिमुद्रणाला उपस्थित राहून या गाण्यामध्ये आपला सूर मिसळावा," असं आवाहन कौशल इनामदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलं आहे.

इच्छुक व्यक्तींनी मंदार गोगटे ९८२०८७७२७९ अथवा अस्मिता पांडे ९८३३३४५६८४ यांच्याशी मंगळवार दि. ३ नोव्हेंबर २००९ पर्यंत संपर्क साधावा.