मराठी अभिमानगीताचा प्रवास – भाग १


आपल्याला पाय आहेत ही जाणीव आपल्याला सर्वात अधिक कधी होते? खूप चालून पाय दुखू लागले की जशी पायांच्या अस्तित्त्वाची आपल्याला जाणीव होते तशी एरवी कधीच होत नाही! पडसं झालं की नाकाच्या अस्तित्त्वाची जाणीव, बोट चिमटलं की बोटाच्या अस्तित्त्वाची जाणीव! तसंच जेव्हां माझी अस्मिता दुखावली गेली तेव्हां मी एक मराठी माणूस, एक मराठी संगीतकार असल्याची जाणीव मला झाली.

एका जिंगलच्या ध्वनिमुद्रणाच्या निमित्ताने मी मुंबईमधल्या एका व्यावसायिक रेडियो वाहिनीच्या (एफ.एम्‍ स्टेशन) स्टुडियोमध्ये गेलो होतो. काम झाल्यावर तिथे माझा मित्र असलेल्या एका रेडियो जॉकीला अगदी सहज विचारलं –

"काय रे, तुमच्या वाहिनीवर मराठी गाणी का नाही लागत?"

"आमची पॉलिसी आहे." त्याने उत्तर दिलं.

"तुमची महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी गाणी लावण्याची पॉलिसी आहे?!" मी आश्चर्याने विचारलं.

त्याने मान डोलावली.

"अशी पॉलिसी तुमची भारताच्या कुठल्या इतर शहरामध्ये आहे? कोइमतूरमध्ये तमिळ गाणी लावणार नाही, अशी पॉलिसी आहे? बेंगळूरूमध्ये कन्नड गाणी लावणार नाही, अशी पॉलिसी आहे? कोलकात्यामध्ये बंगाली गाणी लावणार नाही, अशी पॉलिसी आहे?"

"अरे, मुंबईची गोष्ट वेगळी आहे मित्रा!" त्याने मला समजावलं. "मुंबई कॉस्मोपॉलिटन आहे."

"मान्य आहे ना. कॉस्मोपॉलिटन बेंगळुरूही आहे! पण तिथे कन्नडा गाणी लागतात की. कारण बेंगळुरू कर्नाटकाची राजधानी आहे. तसं मुंबईही महाराष्ट्राची राजधानी आहे. मग इथे मराठी गाणी लावायची नाहीत, असं धोरण तुम्ही अवलंबता?"

पहिल्यांदा माझा मित्र निरुत्तर झाल्यासारखा झाला. मी पुढे म्हणालो –

"तुम्ही हिंदी गाणी लावता, आणि त्याचा आनंद आहेच आम्हाला. तुम्ही पंजाबी गाणी लावता, याचाही आनंद आहे. पण पंजाबी ते कॉस्मोपॉलिटन आणि मराठी ते व्हर्नॅक्युलर हा न्याय कुठला? म्हणजे रब्बीचं 'बुल्ला की जाणां' तुम्हाला चालतं, पण सलील-संदीपच्या 'डिबाडी डिबांग'चं तुम्हाला वावडं का?"

हे ऐकल्या नंतर मात्र त्या रेडियो जॉकीने शस्त्र खाली ठेवली. तो म्हणाला –

"अरे खरं सांगायचं तर आमचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ना, त्यांना असं वाटतं की मराठी गाणी लावली तर रेडियो स्टेशनला एक 'डाउनमार्केट फील' येईल."

इथे मात्र मी चमकलो. 'डाउनमार्केट फील'? मराठी मुळे? एखादी भाषा 'डाउनमार्केट' असते असं ठरवण्याचा अधिकार या तथाकथित वरिष्ठ अधिकार्‍यांना कोणी दिला? आणि मराठी डाउनमार्केट म्हणजे हास्यास्पद विधान होतं!

युनेस्कोच्या एका सर्व्हेनुसार जागात सुमारे ६५०० भाषा आणि बोली भाषा आहेत. यात सर्वाधिक बोलल्या जाणार्‍या भाषा क्रमवार लावल्या तर एन्कार्टा विश्वकोशाप्रमाणे मराठीचा क्रमांक पंधरावा आहे. पंधरावी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा ही आकडेवारीच्या जोरावरच 'डाउनमार्केट' कशी असू शकते? इतकंच नव्हे, तर काही वर्षांपूर्वी अमेरिकाच्या 'नासा' या संस्थेने 'व्होयेजर' नावाचं एक यान अंतराळात पाठवलं होतं. त्या यानातून पृथ्वीवरच्या संस्कृतीची नोंद करणारी एक 'ग्रामोफोन रेकॉर्ड' अंतराळात पाठवण्यात आली आहे. या ध्वनिमुद्रिकेचा हेतू हा की परग्रहावरल्या जीवांना पृथ्वी आणि तिच्या संस्कृतीची माहिती उपलब्ध व्हावी. या 'गोल्डन रेकॉर्ड'मध्ये परग्रहवासीयांच्या नावे एक संदेश ध्वनिमुद्रित केला गेला आहे. हा संदेश जगाच्या ५५ भाषांमध्ये ध्वनिमुद्रित केला आहे, ज्यामध्ये भारतातल्या ९ भाषा आहेत. या भाषांमध्ये मराठीचा समावेश आहे. (मराठीमधला हा संदेश तुम्ही इथे ऐकू शकता!)

इथेच ही कथा संपत नाही. याच 'गोल्डन रेकॉर्ड'मध्ये पृथ्वीतलावरचं संगीतही ध्वनिमुद्रित करून पाठवलं आहे. जगाच्या वेगवेगळ्या कोपर्‍यातल्या संगीताचा यात समावेश आहे. अमेरिका, मेक्सिको, जर्मनी, अज़रबैजान, पेरू, चीन,बल्गेरिया, इंग्लंड, रशिया, ऑस्ट्रिया, अशा विविध देशांमधलं संगीत या ध्वनिमुद्रिकेत आहे. यात भारताच्या संगीताचं प्रतिनिधित्व केसरबाई केरकर करतात. त्यांची बंदिश – 'जात कहाँ हो' – ही या ध्वनिमुद्रिकेत समाविष्ट करण्यात आली आहे.

तात्पर्य काय – तर जिथे 'नासा'ला अंतराळातही कुणी परग्रहवासी मराठी समजू शकेल असं वाटतं, तिथे महाराष्ट्राच्या राजधानीतच "तुमची भाषा 'डाउनमार्केट' वाटेल" असं म्हणणार्‍या या रेडियोच्या 'वरिष्ठ' अधिकार्‍यांचा मला मनस्वी राग आला! बरं, मराठी गाणी महाराष्ट्रात ऐकायची नाहीत तर कुठे आसाममध्ये ऐकायची?!

त्या रेडियोजॉकी मित्राशी फार वाद न घालताच मी बाहेर पडलो आणि मला आढळलं की ही परिस्थिती मुंबईत आणि महाराष्ट्राच्या बहुतांश शहरांमध्ये अशीच आहे. मुंबईमध्ये व्होडाफोनसारख्या मोबाईल कंपन्या मराठीतून बोलायला नकार देत होत्या. पुण्यामधल्या रेडियो वाहिन्या नवी मराठी गाणी वाजवायला नकार देत होत्या. चित्र विदारक होतं!

मुंबईमधली परिस्थिती अधिक बिकट होती आणि आहे. आज मुंबईमध्ये आपल्याला भाजीपाला मराठीतून विकत घेता येत नाही की एका जागेहून दुसर्‍या जागी मराठीतून जाता येत नाही! म्हणजे महाराष्ट्रात मुंबई आहे पण मुंबईत महाराष्ट्र कुठेही दिसत नाही!

प्रश्न फक्त मुंबईचाही नव्हता. मराठी लोकांमध्येच मराठी भाषेच्या बाबतीत एक औदासिन्य आहे, असं प्रकर्षाने जाणवत होतं. मुळातच मराठी 'डाउनमार्केट' आहे, हा संकेत इतर भाषकांपर्यंत पोचतो तरी कुठून? कुणाकडून? आणि उत्तर येतं – आपल्याकडून! आणि धोक्याचा इशारा तेव्हाच असतो जेव्हा आपल्यालाच आपली भाषा डाउनमार्केट आहे असं वाटू लागतं.

माझ्या मनात विचार आला की आपण राजकारण्यांना शिव्या घालतो, सरकारच्या नावाने ठणाणा करतो, पण या सगळ्या प्रश्नाबाबत आपण काय करतोय? असा आत्मपीडाकारक प्रश्न सतत मला भेडसावत राहिला. पण मी काय करू शकत होतो? मी संगीतकार आहे आणि मी गाणं करू शकतो एवढंच एक सत्य माझ्या डोळ्यासमोर दिसत राहिलं.

इतर भाषकांना "मराठीचा आदर बाळगा" असं सांगण्याअगोदर खरी गरज होती ती मराठी माणसांच्या मनात मराठीचा अभिमान रुजवण्याची. मराठीला गरज होती एका अभिमानगीताची!