मराठी अभिमानगीत - एक संवाद



[caption id="attachment_43" align="alignleft" width="210" caption="अमिताभ बच्चन यांनी सत्कार केला"][/caption]

मराठी अभिमानगीत प्रकाशित झाल्यानंतर त्यावर कौतुकाचा वर्षाव झाला आणि तो अखंडित सुरू आहे. किंबहुना वाढतोय. अगदी कविवर्य शंकर वैद्यांपासून संगीतकार पद्मभूषण श्रीनिवास खळे यांच्यापर्यंत, लोकसत्तेचे संपादक कुमार केतकर ते जाहिरात क्षेत्रातले तज्ज्ञ प्रशांत गोडबोले यांच्यापर्यंत, शाहिर विठ्ठल उमपांपासून सुलेखनकार अच्युत पालवांपर्यंत आणि माझ्या मित्राचा इंग्रजी माध्यमात शिकणारा ११ वर्षांचा मुलगा ते थेट महानायक अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत अनेक अनेक लोकांनी या गाण्याचं भरभरून कौतुक केलं आणि करताहेत.

जसं कौतुक आलं तसेच अनेक हिणकस शेरे, टीका, टिंगल, नापसंती, अगदी अपमानसुद्धा... यांनाही तोंड द्यावं लागलं. इंटरनेटवर चाळचाळता सहज sureshbhat.inवर एक पोस्ट वाचायला मिळाला. तो पोस्ट आणि त्याला लिहिलेलं उत्तर असं दोन्ही मी खाली नमूद करत आहे. कौतुक झालं की सर्वांनाच बरं वाटतं पण टीका झोंबते... जिव्हारी लागते. पण ही टीका बाजूला सारून पुन्हा नव्या जोमाने आपण आपला विश्वास असलेल्या कामात पुन्हा बुडून जातो. त्या पोस्टला माझं हे उत्स्फूर्त उत्तर आहे. त्यावेळी जे मनात आलं ते मी उतरवलं आहे.



अजय अनंत जोशी यांचा पोस्ट

अजय अनंत जोशी [08 मार्च 2010]

गाणे झाले. सर्वांनी ऐकले. स्टेजवर पाहिले. टाळ्या वाजवल्या. पुढे काय?
"हे मराठी अभिमानगीत आहे. हे कॉलरट्यून म्हणून सेट करा." मला असा रोज एस.एम.एस.येत आहे. हे अभिमान गीत आहे हे लोकांना वाटले पाहिजे ना? जबरदस्ती कशाला...?
टीप : या गाण्यात नाविन्यपूर्ण काय आहे हा संशोधनाचा विषय आहे...:)

माझं उत्तर

प्रिय अजयजी,

आपण म्हणता गाणे झाले. सर्वांनी ऐकले. स्टेजवर पाहिले. टाळ्या वाजवल्या. पुढे काय?

याचं आधी आपल्याला उत्तर देतो. आपण जे दोन-दोन शब्द वापरले आहेत, त्या प्रत्येक दोन शब्दांमागे माझे आणि माझ्या सहकार्‍यांचे अपार कष्ट आहेत. तुम्ही म्हणता ‘गाणे झाले’. आमच्यासाठी अजयसाहेब हे दोन शब्द म्हणजे दीड वर्षांचा कालावधी होता. अपार कष्ट, मेहनत आणि जबस्दस्त इच्छाशक्तीच्या बळावर झालेलं हे कदाचित जगातलं सर्वात भव्य गीत आहे. या आधी जगात असा दाखला नाही की ११२ प्रस्थापित कलाकार एकत्र आले आंणि त्यांनी एका गीतात आपला सहभाग नोंदवला. ३५६ लोकांचं समूहगान हे अख्ख्या भारतामध्ये याआधी कधीही ध्वनिमुद्रित केलं नव्हतं. आज एव्ही मॅक्स या मासिकाने एक "जागतिक दर्जाचं ध्वनिमुद्रण" म्हणून या गीताला मान्यता दिली आहे. या गाण्यामुळे प्रथमच ५००हून अधिक कलाकार एकत्र आले आहेत आणि हे मराठीत होतंय. ही तुमच्यासाठी "नाविन्यपूर्ण" गोष्ट नसेल कदाचित... माझ्यासाठी आहे!

टाळ्या वाजवल्या. या दोन शब्दांचं मोल कदाचित तुम्हाला कळणार नाही अजयजी! या गाण्याच्या प्रकाशन समारंभाला तब्बल ८००० लोक उपस्थित होते. यापूर्वी कुठल्याही ध्वनिमुद्रिकेच्या प्रकाशनासाठी इतका मोठा जनसमुदाय महाराष्ट्रात एकत्र आल्याचं निदान मला तरी आठवत नाही. कार्यक्रमाच्या शेवटी जेव्हा शंभरहून अधिक कलाकारांनी हे गीत गायलं तेव्हां १६००० ओले डोळे आपल्यावर रोखले असणं म्हणजे काय, हा अनुभव या शंभर कलाकारांसाठी काय होता हे तुम्ही त्यांनाच विचारा. हे गाणं संपल्यावर १० सेकंद नीरव शांतता पसरली आणि ८००० लोकांचा जनसमुदाय उत्स्फूर्तपणे उठून उभा राहिला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. ह्या टाळ्या फुकट आल्या नाहीत जोशीसाहेब! यासाठी अश्रु, घाम, आणि आयुष्यातलं दीड वर्ष केवळ आणि केवळ आपल्या मातृभाषेसाठी देणारे अनेक माझे सहकारी होते.

पुढे काय? जोशीसाहेब, तुम्ही रेडियो ऐकता का? पुण्याच्या रेडियो मिर्चीचं धोरण होतं की नवीन मराठी गाणी आपल्या वाहिनीवर लावायची नाहीत. या गाण्यापासून त्यांनी हे आपलं धोरण बदललं. मुंबईमध्ये तर अजिबात मराठी गाणी लागत नसत. या गीतापासून बिग एफ.एम. या वाहिनीने मराठी गाणी नियमितपणे लावायला सुरुवात केली. ह्या गाण्यामुळेच व्होडाफोन कंपनी ज्यांचं मराठीत बोलाणार नाही असं धोरण होतं, त्यांना ते बदलावं लागलं. अशा अनेक गोष्टी सांगता येतील. अमेरिकेतून मला अनेक फोन आणि ई-मेल आले की अमेरिकेत जन्माला आलेली मराठी कुळातली मुलं आनंदाने हे गाणं ऐकताहेत, गाताहेत. महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या एका तमिळ मुलीने या गीताबद्दल आपल्या ब्लॉगवर लिहितांना म्हटलंय की हे गीत ऐकल्यावर मला मी महाराष्ट्रीय असल्याचा अभिमान तर वाढलाच, पण कौशल आणि त्याच्या सहकार्‍यांची आपल्या मातृभाषेबद्दल असलेली तळमळ पाहून माझ्या मातृभाषेशी पुन्हा एकदा नाळ जुळली.
नाविन्यपूर्ण काय? संगीत म्हणून हे दर्जेदार आणि उत्तम आहे असं पं. सुरेश तळवलकर, अश्विनी भिडे-देशपांडे, आरती अंकलीकर-टिकेकर, हरिहरन, शंकर महादेवन, पद्मभूषण श्रीनिवास खळे (ज्यांनी गाणं ऐकून माझ्या खिशात पाचशे रुपयाची नोट जबरदस्ती कोंबली) आणि इतर अनेक लोक म्हणालेत. अमिताभ बच्चन यांनाही या गाण्याची मोहिनी पडलीच ना! मला एकदा खुद्द पु.ल.देशपांडे म्हणाले होते, "कौशल, तू चांगलं करत रहा, नवीन आपोआप घडेल!" मी त्यांच्या सल्ल्याप्रमाणे जातोय, जोशीसाहेब!
जबरस्ती कशाला? जोशीसाहेब आपण लोकशाहीत राहतो. तुमची मोबाईल सेवा त्यांच्या पद्धतीने या गाण्याचा प्रसार करतेय! कोणाचीही जबरदस्ती नाही की तुम्ही हे गीत कॉलरट्यून म्हणून लावावं! अनेक अशा जाहिराती तुम्ही पचवताच की एरवी. आणि तुमच्या माहितीसाठी मोबाईल कंपन्यांना आदेश दिला की असे जाहिरात करणारे एस.एम.एस. बंद करा तर ते ऐकतात की तुमचं! जबरदस्तीचा प्रयत्न येतोच कुठे!!

शेवटी जोशीसाहेब, तुमच्याच शैलीत मी तुम्हाला देखिल विचारू शकतो - "टीका केलीत, टिंगलही केलीत. पुढे काय?" पण मी तसं करणार नाही. तुम्ही या गाण्याचा हिस्सा आहात आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. मी आधीही म्हटलं होतं (तुम्ही सहभाग नोंदवायच्याही आधी) की या गाण्यामुळे काय फरक पडेल मला नाही सांगता येणार, पण हे एक पहिलं पाऊल आहे जे मी उचलू शकतो. ते मी उचललं. या गाण्यात काय नाविन्यपूर्ण आहे, काय नाही याचं संशोधन आपण करावं. आपण याच्यापेक्षा निश्चितच जास्त काहीतरी केलं असेल म्हणून इतक्या अधिकाराने (आणि माफ करा, पण थोड्या हिणकस पद्धतीनेही) आपण या गाण्याच्या मूल्याबद्दल लिहिलं आहे. मला तूर्तास इतकंच ठाऊक आहे की माझ्या कुवतीप्रमाणे, अतिशय प्रामाणिक असं पाऊल मी उचललेलं आहे. आणि ते मी शेवटपर्यंत निभावणार आहे. ते तुमच्या पसंतीस उतरलं नसेलही पण हे गाणं ज्यांना आवडलं आहे आणि ज्यांच्यामध्ये मराठीचा अभिमान या गाण्याने पुन्हा चेतवला आहे, त्या लोकांची कास धरून मला हा प्रवास पुढे असाच चालू ठेवायचा आहे. आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.

कौशल




Labels: , ,