‘अर्थ’शून्य भासे मज...

सुमारे बारा वर्षांपूर्वीची कथा आहे.

‘महाराष्ट्र टाइम्स्‍’ मध्ये मी केलेल्या पहिल्या अल्बमचं – शुभ्र कळ्या मूठभरचं – परीक्षण आलं होतं. त्यात पत्रकाराने –

“या ध्वनिफीतीला किर्लोस्कर आणि फिनोलेक्स उद्योग समूहांनी मदत करून सुद्धा पन्नास रुपये ही किंमत जरा जास्त वाटते.- ”

असं लिहिलं होतं. मी जरा खट्टू झालो. पहिली गोष्ट – ध्वनिफीतीमध्ये एरवीच्या आठ गाण्यांऐवजी अकरा गाणी होती. दुसरी गोष्ट – या उद्योग समूहांनी मदत का केली होती आणि किती आणि कुठल्या स्वरूपाची केली होती ते काही पत्रकाराला माहित नव्हतं. आणि तिसरी आणि माझ्या दृष्टीनं महत्वाची गोष्ट म्हणजे त्या पत्रकाराने काही ती ध्वनिफीत विकत घेतली नव्हती ! त्याला मीच ती दिली होती !

मी माझा पहिला अल्बम करायचा ठरवला तो क्षण उत्साहाचा होता. शान्ताबाई शेळके यांच्या रचनांवर आधारित ‘शुभ्र कळ्या मूठभर’ हा कार्यक्रम केला आणि त्या कार्यक्रमाला मिळालेल्या प्रतिसादानंतर घेतलेला हा निर्णय होता. या निर्णयात मित्रांच्या, आप्तांच्या उत्साहाचा गुणाकार होत गेला आणि हालचालींना वेग आला. ‘शुभ्र कळ्या मूठभर’ची संपूर्ण जन्मगाथा अतिशय रोचक आहे, तरी वो कहानी फिर सही! एक अल्बम तयार करून रसिकांसमोर येईपर्यंतच्या अर्थकारणा संबंधी मी घेतलेले काही अंबटगोड अनुभव, एवढेच आज मी मांडणार आहे.

एका अल्बमचं ध्वनिमुद्रण करण्यासाठी काय खर्च येईल याचा हिशोब मांडू लागल्यावर हळुहळू त्या उत्साहात आश्चर्य, भीती, काळजी, अविश्वास, अशा वेगवेगळ्या भावनांच्या रंगांची मिसळण सुरू झाली. स्टुडियोचे दर तासावर असतात... व्यावसायिक गायक – वादक एकेका गाण्याचे चार आकडी पैसे घेतात... अशा उत्साहावर पाणी सोडणाऱ्या गोष्टी कळू लागल्या.

एखादी कॅसेट कंपनी शान्ता शेळकेंच्या रचनांची ध्वनिफीत करायला सहज तयार होईल अशी एक भाबडी आशा मनाशी बाळगून एका निर्मात्यासाठी शोधयात्रेचा प्रारंभ झाला. पण लवकरच सत्यपरीस्थितीची जाणीव होऊ लागली. ‘कोण शान्ता शेळके?’ इथपासून ‘त्यापेक्षा तुम्ही कोळीगीतं करा... त्यांना जास्त चांगला खप असतो.’ पर्यंत - अशी निरनिराळी वाक्य कानावर पडू लागली आणि शेवटी कंपनीच्या नादी न लागता आपणच या ध्वनिफीतीची निर्मिती करावी असं ठरलं.

रेकॉर्डिंग करण्यासाठी आम्हाला थोडी आर्थिक मदत किर्लोस्कर आणि फिनोलेक्स उद्योगसमूहाने केली. आणि पं. सत्यशील देशपांडे यांच्या संवाद फाऊंडेशनने त्याला हातभार लावला. अल्बम मध्ये एकूण अकरा गीतं होती आणि काही आमच्याच मित्रमंडळींनी तर काही गीतं पं. सत्यशील देशपांडे, साधना सरगम, शोभा जोशी अशा व्यावसायिक कलाकारांनी गायली. संपूर्ण अल्बम साठ हजार रुपयांमध्ये तयार करण्याची सर्कस आम्ही शेवटी एकदाची पार पाडली.

साठ हजार रुपये फक्त मास्टर कॅसेट बनवण्याचा खर्च. आता येणार होता ध्वनिफीतींच्या प्रतींचा खर्च !  त्यावेळी सीडी मराठी मध्ये इतक्या प्रचलित नसल्यामुळे कॅसेटच काढयचं ठरलं. तरी एका कॅसेटला साधारण १५ रुपये खर्च येणार होता. हा खर्च कॅसेटमधल्या टेपची प्रत आणि लांबी यावर ठरत असे. शिवाय इनले कार्ड आणि कॅसेटवर केलेली छपाई. ३००० प्रती छापल्या तर १५रुपयांप्रमाणे ४५००० रुपये. यात ६०००० रुपये म्हणजे १,०५,००० रुपये असा खर्च या ३००० प्रतींचा आला. शिवाय कॅसेटच्या प्रकाशनाचा समारंभ, रीटेलर आणि डिस्ट्रिब्युटर यांची दलाली, असे सगळे खर्च धरले तर कॅसेटची किंमत किमान रु. ७५ ठेवली तर ३००० विकल्यावर नुकसान होणार नाही अशी परीस्थिती होती. तरी इतकी किंमत नको... ५० रुपयांपर्यंत करू आणि पुढच्या आवृत्तीच्या वेळी नुकसान भरून काढू असा निर्णय घेण्यात आला.

त्या पत्रकाराने ध्वनिफीतीच्या किंमतीवर लिहिल्यावर मला थोडा राग जरूर आला होता, पण जसा काळ लोटत गेला आणि मी संगीताकडे व्यवसाय म्हणून पाहू लागलो तसं मला मराठी ध्वनिमुद्रित संगीताच्या अर्थकारणाबद्दल लोकांमध्ये आणि कलाकारांमध्ये ही किती अज्ञान आहे हे उमगत गेलं.

आज ही परीस्थिती बदलली असली तरी फार बरी नाही. जी परीस्थिती बदलली आहे ती जास्त निर्मितीच्या स्तरावर बदलली आहे. पण मार्केटिंग आणि डिस्ट्रिब्युशन ही क्षेत्र अजून अंधारातच आहेत.

शुभ्र कळ्या मूठभर नंतर मी आणखीन एक अल्बम केला होता. त्याची निर्मिती ही मीच केली. या अल्बम मध्ये हौशी असे गायक कोणीच नव्हते. निर्मितीप्रक्रीयेतच अडीच – तीन लाख रुपये खर्च आला होता. ती एका मल्टी-नॅशनल ऑडियो कंपनीच्या पदाधिकाऱ्याने ऐकुन मला बोलावलं.

“आमची कंपनी तुझा अल्बम मार्केट करेल. तुला १० टक्के रॉयल्टी देऊ.” अशी त्याने घोषणाच करून टाकली.

मी विचारलं – “पण तुम्ही तुमच्या बाजूने काय करणार? व्हीडियो करणार का? जाहिरात करणार का?”

तो पदाधिकारी हसला. “मराठी साठी हे सगळं परवडत नाही. मागे अमुक अमुक कलाकाराचा अल्बम आम्ही केला आणि दहा हजार प्रती ही नाही खपल्या.”

हा अमुक अमुक कलाकार माझ्यापेक्षा अधिक नावाजलेला आणि अनुभवी होता. माझ्या मनात विचार आला – आणि मी तो त्या पदाधिकाऱ्याला बोलून दाखवला.

“माझ्यापेक्षा अधिक नावाजलेल्या कलाकाराच्या अल्बमच्या तुम्ही दहा हजार प्रतीच विकल्यात, तर माझ्या अल्बमच्या किती विकाल? पण आपण असं धरून चालू की दहा हजार प्रती विकल्यात तरी दहा टक्क्यां प्रमाणे जास्तीत जास्त तुम्ही मला पन्नास हजार रुपये द्याल – तेही एका वर्षभराच्या काळात. मला खर्च आला आहे अडीच लाख रुपये. अगदी नफा नाही झाला तरी खर्च केलेले पैसे परत मिळावे अशी माझी किमान अपेक्षा आहे. तरच मी माझा पुढचा अल्बम करू शकतो.”

“तुझं म्हणणं बरोबर आहे, पण आमच्या कंपनीची हीच पॉलिसी आहे” -  असं म्हणत त्या मल्टीनॅशनल कंपनीच्या पदाधिकाऱ्याने मला रामराम ठोकला.

आज वैयक्तिक पातळीवर निर्मिती करू पाहणारे मराठी भावसंगीतामध्ये अभावानेच सापडतात. आणि एकदा निर्मिती करणारे दुसऱ्यांदा त्याच्या वाटेला जात नाहीत. किंवा गायक, संगीतकार, हे त्यांना प्लॅटफॉर्म मिळावा या हेतूने एखाद्या अल्बमची निर्मीती करतात. पण व्यवसाय म्हणून ते याकडे पाहत नाहीत ही खेदाची गोष्ट आहे.

या मध्ये इंटरनेटवर सहज उपलब्ध होणारे संगीत, पायरेटेड एम्पी ३ सीडीज्‍, रेडियो (आणि रेडियोकडून न मिळणारी रॉयल्टी) या सगळ्या कारणांचा समावेश आहे. पण माझ्या दृष्टीने प्रमुख कारण हे चांगल्या आणि प्रामाणिक वितरण व्यवस्थेचा अभाव. मोठ्या कंपन्या ज्यांची वितरण व्यवस्था जागेवर आहे, आ वासून छोट्या निर्मात्यांना गिळंकृत करायला बसल्या आहेत.

आता ही परवाचीच गोष्ट. एक निर्माता मराठी भावगीतांची सीडी घेऊन एका मोठ्या ऑडियो कंपनीकडे गेला. त्याला ध्वनिमुद्रण प्रक्रीयेत साधारण तीन लाख रुपये खर्च आला आहे. कंपनीचे अधिकारी त्याला म्हणाले.

“सीडी उत्तम आहे तुमची. आम्ही त्याचं मार्केटिंग करायला तयार आहोत. आपण १५० रुपये किंमत ठेऊया. तुम्हाला आम्ही दहा टक्के रॉयल्टी देऊ. फक्त तुम्हाला आमच्याकडून कमी दरात – म्हणजे १०० रुपयात सीडीच्या २००० प्रती विकत घ्याव्या लागतील !”

म्हणजे रतन टाटांना इंडिका चालवायची असेल तर ती त्यांना वासन मोटर्स मधून विकत घ्यावी लागणार !

एवढं करून सुद्धा एक ठराविक प्रकारच्या संगीतालाच या कंपन्या मान्यता देतात. पण प्रत्येक संगीतकारालाच काही ‘कोंबडी’च्या मागे धावायचं नसतं आणि प्रत्येक श्रोत्याला काही तेच संगीत ऐकायचं नसतं. वेगवेगळया संगीताची आवड असणारे समाजात आहेत, पण एखाद्या व्होट बँक प्रमाणे ऑडियो कंपन्यांना एक ठराविक संगीत ऐकणारा श्रोताच (बहुतेक वेळा प्रेक्षक) अपेक्षित असतो.

एकूण संगीताच्या ध्वनिमुद्रिकांचा उद्योग हा अंधेर नगरी – चौपट राजा या धरतीवर चालला आहे यात शंका नाही. पण या अशा परीस्थितीमुळेच कमलेश भडकमकर सारख्या एखाद्या संगीत संयोजकाला वाटतं की पर्यायी संगीतप्रकारही लोकांपर्यंत पोचले पाहिजेत आणि तो स्वत:ची ऑडियो कंपनी सुरू करण्यास प्रवृत्त होतो. आणि गरज हीच आहे, एका मधल्या संस्थेने हे ठरवू नये की संगीतकाराने काय प्रकारचे संगीत करावे आणि श्रोत्यांनी कोणत्याप्रकारचे संगीत ऐकायला हवे. संगीतकार आणि श्रोत्यांमध्ये थेट संवाद व्हावा.

मार्गात अडथळे खूप आहेत पण संगीतकार आणि श्रोत्यांमधून अडथळा निर्माण करणारी वितरणव्यवस्था बदलली तर मराठी ध्वनिमुद्रित संगीताला एक नवा ‘अर्थ’ नक्की सापडेल.