सामान्यतेच्या पलिकडे


एक सामान्य माणूस रस्त्यावरून जात होता. रस्त्याच्या कडेला त्याला एक कुष्ठरोगी दिसला. सामान्य माणसाला त्याची किळस वाटली, भीती वाटली आणि त्या कुष्ठरोग्याकडे दुर्लक्ष करून तो आपल्या मार्गाला लागला. घरी आल्यावर मात्र हा सामान्य माणूस अस्वस्थ होता. काही केल्याने त्या कुष्ठरोग्याची प्रतिमा त्याच्यासमोरून हटेना. एखाद्या आपल्या माणसाला असा रोग झाला असता, तर आपण असंच दुर्लक्ष करून तोंड फिरवलं असतं का, आपल्या बायकोला, मुलांना हाच आजार झाला तर आपण त्यांच्याशी असेच वागू का, असे प्रश्न त्याच्या मनात पिंगा घालत राहिले. या अस्वस्थतेने त्या सामान्य माणसाला जगू दिलं नाही. तो पुन्हा त्या जागी गेला जिथे तो कुष्ठरोगी त्याला दिसला होता. कुष्ठरोगी तिथेच होता. त्या सामान्य माणसाने कुष्ठरोग्याला आपल्या घरी आणलं आणि त्याच्या जखमा धुतल्या, स्वच्छ केल्या. त्याच्यावर उपचार केले... आणि ठरवलं की आपण कुष्ठरोग्यांसाठीच काम करायचं. आणि आयुष्यभर त्याने हेच केलं. आपण त्या असामान्य माणसाला बाबा आमटे म्हणून ओळखतो!
डॉ. प्रकाश आमटे यांच्या ‘प्रकाशवाटा’ या पुस्तकात हा प्रसंग वाचला आणि मी सुन्न झालो. यात सगळ्यात ठळक सत्य जे माझ्या डोळ्यासमोर दिसत होतं ते म्हणजे बाबा आमटेंनाही त्या कुष्ठरोग्याची किळस आणि भीती वाटली. विस्मयकारक? पण जगातल्या सर्व असामान्य माणसांच्या चरित्रांवरून नजर टाकली की लक्षात येतं की या सार्‍यांचा प्रवास सामान्यतेमधूनच झाला आहे. सामान्यतेच्या पलिकडे जाण्यासाठी त्यांना सामान्यता ‘ओलांडून’ जावं लागलं आहे... एकाही असामान्य व्यक्तीला ती सामान्यता चुकवण्याचं भाग्य लाभलं नाही!
शूर माणसाला भीती अनुभवल्याशिवाय शौर्य गाजवता येत नाही. प्रतिभावान माणसाला काहीच न सुचण्याच्या आत्मपीडाकारक मन:स्थितीतून जावंच लागतं! मी कुठेतरी वाचलं होतं की एक शूर माणूस एका भेकड माणसापेक्षा १० मिनिटं जास्त शूर असतो! आइन्स्टाइनने एका ठिकाणी म्हटलंय – “मी काही इतरांपेक्षा फार बुद्धिमान वगैरे नाही, पण मी प्रश्नांच्या सान्निध्यात जास्त वेळ राहतो.”
जगात तीन प्रकारची माणसं असतात. एक – जी अस्वस्थ होतच नाहीत. संदीप खरेने लिहिलेल्या “मी मोर्चा नेला नाही...” या गीताच्या कॅटेगरीत मोडणारी! दोन – जी अस्वस्थ होऊन विघातक काहीतरी करतात. आणि तीन – बाबा आमटेंसारखी – आपल्या अस्वस्थतेतून आनंदवन फुलवणारी!
माझ्यासारख्या सामान्य माणसाला हे अतिशय दिलासा देणारं आहे. ‘त्याचं काय बुवा, तो तर असामान्यच आहे!’ असं म्हणण्याचे सगळे रस्ते आता बंद झाले आहेत. ही सगळी माणसं याच सामान्यतेमधून गेली आहेत. त्यांना जमलं आहे ते एक दिवस आपल्यालाही जमेल. फक्त अस्वस्थतेतून आनंदवन फुलवता आलं पाहिजे!

© कौशल श्री. इनामदार, 2012


Labels: , , , ,