५०० वर्षांचा संशयकल्लोळ !
५ एप्रिल रोजी ‘संशयकल्लोळ’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची बीजं खरं तर अनेक वर्षांपूर्वी पेरली गेली होती, जेव्हां चेतन दातारने आमच्या रूपारेल महाविद्यालयात ‘निःसंशयकल्लोळ’ नावाने ‘संशयकल्लोळ’ या नाटकाचं रूपांतर केलं होतं. त्या एकांकिकेत सुमीत राघवन, सचित पाटील या कलाकारांनी कामं केली होती. पुढे दोन-तीन वर्षांनी हीच एकांकिका विशालने, म्हणजे माझ्या भावाने, त्याच्या महाविद्यालयात (पुण्याचं बी.एम.सी.सी महाविद्यालय) सादर केली होती, ज्यात राजेश कोलन, विजय पटवर्धन या लोकांनी कामं केली होती. तेव्हांपासूनच डोक्यात हा विचार सुरू झाला होता की या संहितेवर उत्तम चित्रपट तयार होईल.
 वास्तविक ‘संशयकल्लोळ’ हा विषय अतिशय जुना आहे. जवळपास ५०० वर्षांपूर्वी मोलिएरने एक ‘सानरेल’ नावाचं नाटक लिहिलं होतं. तो हा विषय ! ‘सानरेल’ हे ओरिजिनल ‘संशयकल्लोळ’. ‘सानरेल’ या मूळ फ्रेंच नाटकावरून आर्थर मर्फीने ‘ऑल इन द राँग’ हे इंग्रजी नाटक रूपांतरित केलं. या नाटकाचं हे आठवं किंवा नववं रूपांतरण होतं. ‘ऑल इन द राँग’वरून गोविंद बल्लाळ देवलांनी ‘तसबीरीचा घोटाळा’ किंवा ‘फाल्गुनरावचा फार्स’ नावाने एक गद्य नाटक लिहिलं. हे साधारण एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी किंवा विसाव्या शतकाच्या अगदी सुरुवातीला लिहिलं. १९०६ साली देवलांनी या गद्य नाटकात पदं टाकली आणि त्याचं ‘संगीत संशयकल्लोळ’ झालं! पदं का टाकली ? तर त्या काळात गद्य नाटकं चालायची नाहीत आणि म्हणून ही पदं टाकावी लागली ! पण फाल्गुनराव आणि कृत्तिका या जोडप्याला फारच कमी पदं या नाटकात आहेत कारण प्रामुख्याने ही क्टर्स पेअर असायची. गणपतराव बोडस फाल्गुनरावचं पात्र रंगवायचे. या नाटकातली बहुतेक पदं अश्विनशेठ आणि रेवतीच्या वाट्याला आली आहेत – ‘संशय का मनी आला?’ किंवा ’कर हा करी’सारखी सुंदर गाणी या नाटकात आहे.
या नाटकाचं शेवटचं पद – म्हणजे भरतवाक्य होतं – ‘चिन्मया सकल हृदया’ जे नंतर मी ‘बालगंधर्व’ चित्रपटात एका वेगळ्या चालीत सादर केलं. ‘चिन्मया’ची मूळ चाल फारच वेगळी होती. ही चाल साधी, सोपी होती कारण या नाटकात सगळेच नट काही गायक नव्हते. मग सगळ्यांना चाल गाता यावी या उद्देशाने ती चाल साधी आणि सोपी ठेवली गेली असावी. पण हे पद ‘बालगंधर्व’मध्ये घेतांना बालगंधर्वांनी ते गायलं असतं तर त्याची चाल कशी झाली असती हा विचार करून मी नव्याने चाल बांधली. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की ‘बालगंधर्व’मध्ये ऐकू येणारी ही ‘चिन्मया’ची चाल... तिच्या पहिल्या दोन ओळी चेतन दातारने आमच्या कॉलेजमध्ये ‘निःसंशयकल्लोळ’ ही एकांकिका बसवली तेव्हां मी कंपोज केल्या होत्या. त्या एकांकिकेत या दोन ओळी ओंकार दादरकर गायला होता. जेव्हा विशालने त्याच्या कॉलेजमध्ये ही एकांकिका बसवली त्यात राहुल देशपांडे (तेव्हां तो कॉलेजमध्ये होता) त्या दोन ओळी गायला. असा या गाण्याचा इतिहास ! आणि शेवटी ते ‘बालगंधर्व’मध्ये आलं !
परत ‘संशयकल्लोळ’कडे येताना – विशालला असं वाटलं की हा विषय या काळात फार सुंदर तर्‍हेने मांडता येऊ शकतो. कारण त्या काळात संशयाने जो कल्लोळ माजवला, गोंधळ घातला तो का? तर त्या काळात संज्ञापनाची म्हणजे कम्युनिकेशन्ची माध्यमं फार कमी होती.... नव्हतीच ! ‘संशयकल्लोळ’ हे नाटक तुम्ही वाचलंत किंवा त्याचा प्रयोग पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल की चिठ्ठ्या चपाट्या हेच संज्ञापनाचं माध्यम होतं. अश्विनशेठची तसबीर फाल्गुनरावच्या घराजवळ पडते आणि तिथून सगळा गोंधळ सुरू होतो. विशालच्या मनात आलं की त्या काळात कम्युनिकेशनची माध्यमं कमी होती म्हणून गोंधळ होता, तर आज ती माध्यमं वाढलीयेत म्हणून गोंधळ आहे. कम्युनिकेशनची माध्यमं कमी असोत की जास्त असोत संशय आणि प्रेम या गोष्टी चिरंतन आहेत आणि तशा त्या राहणार.
नाटकाचा सिनेमा झाला तेव्हा विशाल म्हणाला याचं संगीत करायचंय आणि ते मात्र आजच्या काळाला अनुरूप असंच संगीत करायचं होतं. ‘बालगंधर्व’ आणि ‘अजिंठा’ हे दोन भारदस्त, पिरियड चित्रपट केल्यानंतर ही अशी एक हलकीफुलकी कथा माझ्याकडे आली होती. यात दोन गाणी करायची होती.
पहिलं गाणं असं करायचं होतं की जे आख्ख्या चित्रपटात वाजत राहील. जिथे जिथे गोंधळ वाढतो आणि गडबडगुंडा सुरू होतो त्या त्या ठिकाणी हे गाणं वाजेल. अशोक बागवे सरांनी हे गाणं लिहिलं आणि अवधूत गुप्तेच्या आवाजात ‘गडबडगुंडा’ हे गीत रेकॉर्ड केलं. आपल्याला हे गाणं पूर्ण ऐकायचं असेल तर खालच्या लिंकवर क्लिक करा.
दुसरं गाणं हे एक हलकंफुलकं प्रेमगीत होतं. ते लिहून घेतलं वैभव जोशीकडून. वैभव जोशी हा अत्यंत गुणी गजलकार आहे. मला त्याच्याबद्दल फार आदर आहे. सुरेश भटांनंतर ज्या लोकांनी गजल जिवंत ठेवली आहे आणि या फॉर्मला पुढे घेऊन जात आहेत त्यात वैभव जोशी हे अत्यंत महत्त्वाचं नाव आहे.  फार सुरेख गजला आपण वैभवकडून ऐकल्या आहेत; पण हे अत्यंत हलकंफुलकं, सुंदर असं रोमॅन्टिक गाणं वैभवने लिहिलं आहे.

नकळत विणले जाते जाळे
नकळत गुंतत जाते मन
जिवलग होते कुणीतरी अन्‌
स्वतःस परके होते मन
हे नाते कोणते, हे धागे कोणते
कुणी फुलते दूरवर
दरवळते इथे मन....

संपूर्ण गीत ऐकण्याकरिता खालच्या लिंकवर क्लिक करा.

अशी दोन गाणी या चित्रपटासाठी केल्यानंतर पार्श्वसंगीताच्या वेळी मी जेव्हा हा चित्रपट पाहिला तेव्हा इतकी मजा आली ! कारण विशालनी जी दोन नावं त्याच्या सगळ्या जाहिरातींमध्ये दिली आहेत – त्याने हा चित्रपट अर्पण केलाय  हृषिकेश मुखर्जी आणि राजा परांजपे या दोन दिग्गज दिग्दर्शकांना. त्यांची जी शैली आहे ती कुठेही आक्रस्ताळी विनोद न करता, अंगविक्षेप न करता, शाब्दिक कोट्यांमध्ये न अडकता – सहज, स्वाभाविक विनोद प्रसंगानुरूप येतो तोच विनोदाचा बाज तुम्हाला या चित्रपटात पहायला मिळेल. मला वाटतं विशालला हे फार उत्तम जमलं आहे. विशालने हृषिकेश मुखर्जी आणि राजा परांजपे यांची नावं घेतली आहेत. मला आणखी दोन नावं आठवतात – सई परांजपे आणि गुलज़ार. या चौघांनी जसे चित्रपट हाताळले आहेत तसा हा चित्रपट झालेला आहे. कलाकारांनी उत्तम कामं केली आहेत. सगळे विनोदी अभिनेते असून ओढूनताणून विनोदी काम कोणीही केलं नाहीये. विजय पटवर्धनने या चित्रपटाच्या पटकथेचं आणि संवादाचंही काम बघितलंय आणि सगळ्यात गमतीचा भाग म्हणजे ’फू बाई फू’ सारख्या मालिकेत अत्यंत स्लॅपस्टिक् काम करुनही या चित्रपटात एकमेव गंभीर रोल कुणाचा असेल तर तो विजयचा आहे!
तर ५ एप्रिलला ह चित्रपट संपूर्ण महारष्ट्रात  प्रदर्शित होतोय .....मला तुम्हाला सांगायचंय....की तुम्ही हा चित्रपट जरूर बघा, चित्रपटगृहात जाऊन बघा आणि मी तर म्हणतो फक्त एकदा बघा कारण तुम्ही तो एकदा बघितल्यावर परतपरत चित्रपटगृहात जाऊन  तो पाहालच  याबद्द्ल किंचितही संशय नाही!!