या शुभ्र विरल अभ्रांचे...

मराठी चित्रपट आणि भावगीतांमध्ये प्रेमाच्या वेगवेगळ्या विभ्रमांना जे स्थान आहे, कदाचित तेच स्थान निसर्गाला आहे. अनेक निसर्गगीतं आपल्या परिचयाची आहेत. र्‍या निसर्गगीतांमध्ये निसर्ग हा मानवी भावनांसाठी रूपक म्हणून वापरल्याचं आपल्याला आढळतं. निसर्गाच्या रूपकांमधून मानवी संबंधांचा व्यवहार काव्यात्म पद्धतीने मांडलेला दिसतो. उदाहरणार्थ -

फिटे अंधाराचे जाळे
झाले मोकळे आकाश
दरीखोर्‍यातून वाहे
एक प्रकाश प्रकाश

वरील गीतामध्ये अंधार’, अज्ञान किंवा निराशेचं रूपक आणि प्रकाश ज्ञानाचं किंवा आशेचं रूपक आहे असं समजलं तर मानवी व्यवहाराबद्दलच कवीने मांडलंय असं आपल्या ध्यानात येतं. असं असताना संगीतकार चालीमधून हा मानवी व्यवहार किंवा भावना काय असेल ते सुचवू शकतो आणि र्‍याचदा ते सुचवतो देखिल. जसं फिटे अंधाराचे जाळे मधे श्रीधर फडकेंनी त्यांच्या चालीमधून आणि संगीत संयोजनामधूनही सुचवलं आहे की झाले मोकळे आकाश हे मनाचं लख्ख होण्याचा संकेत आहे.

पण बालकवींच्या काही कविता आहेत, ज्या निस्संदिग्धपणे निसर्गकविता आहेत. ज्यामध्ये निसर्ग एका विलक्षण कॅमेर्‍याने टिपलाय असं वाटावं अशा या कविता आहेत. आज मी एका बालकवींच्या कवितेचं गाणं करताना झालेला माझा सांगितिक आणि भावनिक प्रवास तुम्हाला सांगणार आहे, कारण या अनुभवामधे तुम्हालाही सहभागी करून घ्यावं असं फार तीव्रतेने मला वाटतं. कुठल्याही सामान्य माणसाला होऊ शकतात आणि होतात असे छोटे छोटे साक्षात्कार मलाही वेळोवेळी होत असतात. त्यातले काही साक्षात्कार काळाबरोबर विरून जातात आणि काही आपल्याबरोबर राहतात. हे गीत संगीतबद्ध करण्याचा अनुभव असाच एक छोटासा साक्षात्कार होता जो अजून मी जपून ठेवलाय! (खरं तर बालकवींच्या गाण्याच्या बाबतीत संगीतबद्ध हा शब्द विशोभित वाटतो. बालकवींच्या गीताला आपण संगीताचं तारांगण खुलं करून देतो... त्याला संगीतात बांधत नाही!)

खरंतर हे गीत करायच्या आधीही बालकवींचं एक गाणं मी केलं होतं. अमृताचा वसा या सीडी मध्येही ते आहे आणि ती कविता र्‍याचजणांच्या चांगल्याच परिचयाची आहे. ती कविता होती तारकांचं गाणं

कुणि नाही कुणि नाही
आम्हाला पाहत बाई
शांती दाटली चोहिकडे
या आता पुढेपुढे
लाजत लाजत
हळूच हासत
खेळ गडे खेळू काही
कोणीही पाहत नाही!

भूतलावर सगळी मानवजात निद्रेच्या कुशीत शिरली की आकाशातल्या सगळ्या तारका खाली पृथ्वीवर येऊन खेळतात अशी विलक्षण कल्पना बालकवींनी या कवितेत केली आहे. आपल्याला तारका कशा दिसतात हे कदाचित हजारो कवींनी सांगितलं असेल, पण तारकांना आपण कसे दिसतो हे फक्त बालकवीच सांगतात!

अनेक असले खेळ करूं
प्रेमाशा विश्वात भरूं
सोडुनिया अपुले श्वास
खेळवु नाचवु उल्हास
प्रभातकाळी
नामनिराळी
होऊनिया आपण राहू
लोकांच्या मौजा पाहू!

अशा खेळकर तारकांचं मन बालकवींना वाचता येत असे! या कवितेचं गाणं करतांनाही कवितेमधला निरागसपणा राखणं खूप महत्त्वाचं होतं. तरीही हे बालगीत नाही, कारण दुसर्‍या एका कडव्यामधे -

एखादी तरुणी रमणी
रमणाला आलिंगोनी
लज्जा मूढा भिरुच ती
शंकित जर झाली चित्ती
तिच्याच नयनी
कुणी बिंबुनी
धीट तिला बनवा बाई
भुलवा रमणालाही...
 
असेही शब्द येतात. या कडव्यावरून हे निश्चित होतं की कवी हे बालकवी असले तरी कविता काही बालकविता नव्हती!
चाल करतांना याकडे विषेश लक्ष दिलं की निरागसपणा आणि साधेपणा ठेऊनसुद्धा चालीत उथळ सोपेपणा वाटणार नाही. वाद्यमेळामध्ये सुद्धा बेल्सचा उपयोग केला. सुरेश भटांच्या कवितेत ऐकू येणारे आवाज चांदण्यांचे हेसुद्धा मला हळुवार वाजणार्‍या घंटानादासारखेच ऐकू येतात! चार तरूणींचं गाणं नसून चार तारकांचं गाणं आहे हे ध्यानात ठेऊन ध्वनिमुद्रणाच्यावेळी गायिकांच्या आवाजाला एरवीपेक्षा जास्त रिव्हर्ब (प्रतिध्वनी) दिला. रिव्हर्बमुळे अवकाशाचा पट दाखवण्यात मदत झाली.

बालकवींच्या या गाण्याचा अनुभव गाठीशी होता आणि कवी म्हणून त्यांच्याबद्दलचं कुतूहल खूप वाढलं होतं. त्यांच्या कवितांना संगीत देण्याची इच्छा फार जबरदस्त होती, पण कवितेच्या तुलनेत आपल्याला चाली फार सामान्य सुचताहेत असं सारखं जाणवत राही.
मग एके दिवशी मी पार्ल्याला कुठल्याशा कार्यक्रमाला गेलो होतो. त्याच कार्यक्रमाला कविवर्य शंकर वैद्य आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही पार्ल्याहून दादरपर्यंत लोकल पकडली. गाडीला गर्दी खूप होती पण वैद्य सर कवितेबद्दल इतकं सुंदर बोलत होते की गर्दीचं विषेश काहीच वाटत नव्हतं. दादर आलं तसे आम्ही दरवाज्यापाशी आलो. गाडीच्या दरवाज्यातून बाहेर पाहिलं. पौर्णिमेचा चंद्र दिसत होता. चंद्राभोवती काही ढग होते. वैद्य सरांचं त्या दृश्याकडे लक्ष वेधलं तसे ते म्हणाले -

बालकवींची एक कविता आहे मोहिनी’.

या शुभ्र विरल अभ्रांचे शशीभवती नर्तन चाले...”

मी म्हटलं -
वा! अगदी तेच दृश्य आहे!”

वैद्य सर म्हणाले – “तू चाल दे या कवितेला.”

मी बरं म्हणालो. बालकवींचं पुस्तक होतं घरामध्ये. घरी येऊन लगबगीने ते पुस्तक काढलं. मोहिनी नावाची कविता काढली. कविता चार पानी होती आणि कवितेच्या शेवटी अपूर्ण अशी टीप होती! हे भयानक प्रकरण होतं! चार पानी कवितेला कशी काय चाल देणार! मी ताबडतोब वैद्य सरांना फोन लावला.

सर, ही कविता चार पानी आहे!”

वैद्य सर हसले.

या कवितेच्या पहिल्या बारा ओळी वाच. फक्त पहिल्या बारा ओळींना चाल द्यायची.”

मी वाचल्या. पहिल्या वाचनात फक्त शब्दांचे नाद सुखावत होते पण अर्थ मनावर बिंबत नव्हता

या शुभ्र विरल अभ्रांचे शशीभवती नर्तन चाले
गंभीर धवळली रजनी बेभान पवन ही डोले
तंद्रीतच अर्धी मुर्धी लुकलुकते ताराराणी
ये झुंजुमुंजू तेजाने पूर्वेवर पिवळे पाणी
निस्पंद मंद घटिका ती, अंधुकता धुंद भरीत
ब्रह्मांडमंदिरी गाई सौभाग्य सुभग संगीत
वर मूक मोहने जैसी शशिकिरणे विरघळलेली
इवलाच अधर हलवून, जल मंद सोडिते श्वास
इवलाच वेल लववून, ये नीज पुन्हा पवनांस
निश्चिंत शांति-देवीचा किंचितसा अंचल हाले
रोमांच कपोली भरती कुंजात कोकिला बोले!

वैद्य सर पुढे म्हणाले -
वाचलंस की तुझ्या ध्यानात येईल की पहिल्या दहा ओळीत कुठलाही आवाज होत नाही. सगळं शांत आहे. आता शब्दही पहा या शुभ्र विरल अभ्रांचे पुढे... तंद्रीतच अर्धीमुर्धी...’ इवलाच अधर हलवून’... अकराव्या आणि बाराव्या ओळीत जेव्हा ही शांतता भंग होते, तेव्हा ही निश्चिंत शांतिदेवीचा किंचितसा अंचल हाले...’ ही शांतता भंग होते तीही कशाने तर कोकिळेच्या बोलण्याने!”

हे ऐकून मी थक्क झालो! कसं सुचलं असेल हे बालकवींना, असा भाबडा प्रश्न मलाही लगेच पडला. या बारा ओळी एकाच क्षणाचं वर्णन करत होत्या. रात्र आणि पहाटेच्या उंबर्‍यावरचा क्षण... प्रत्येक ओळीबरोबर मला असं जाणवत होतं की बालकवींनी एक व्हर्च्युअल रिअलिटी निर्माण केली होती. इवलाच अधर हलवून जल मंद सोडिते श्वास...” असं वाचतांना नुसतंच डोळ्यासमोर चित्र उभं राहात नव्हतं तर प्रत्यक्ष आपल्याच अंगावरून वार्‍याची झुळूक गेल्याचा अनुभव होत होता. हाच तो छोटासा साक्षात्कार! कलेचं सामर्थ्य एकाचा अनुभव दुसर्‍यालाही घेऊ शकता येतो यात आहे, आणि काळाच्या सीमारेषाही त्यात पुसल्या जातात!

जी. . कुलकर्णींनी म्हटलंय की कविता वाचल्यावर अनेक पक्षी एकत्र उडाले आहेत असं वाटलं पाहिजे. बालकवींची ही कविता वाचून माझ्या मनातही अनेक पक्षी एकत्र उडाले! अर्थात हे सगळं मधे कविवर्य शंकर वैद्य होते म्हणून अधिक सूक्ष्मतेने अनुभवता आलं.
मी तत्परतेने त्या कवितेला चाल लावायला घेतली, पण काही सुचेना. मघाशी सांगितल्याप्रमाणे कवितेच्या तुलनेत त्याची सुरावट सामान्य वाटत होती. अनेक दिवस ती कविता मनात घोळत राहिली पण चाल काही सुचेना. काही कलात्मक सुचण्यासाठी कलाकाराला खूप पोषक वातावरण हवं असा र्‍या लोकांचा गैरसमज असतो. वस्तुस्थिती अशी आहे की कुठल्याही परिस्थितीत कलात्मक सुचू शकतं. माझ्या मला आवडणार्‍या र्‍या चाली प्रवासात, ट्रॅफिक जॅममध्ये सुचलेल्या आहेत. या अनुभवामुळे मी या कवितेला ट्रॅफिक जॅममध्येही चाल देण्याचा प्रयत्न केला! पण काही जमेना!

जवळजवळ चार महिन्यांनी कोडईकनालला मी गेलो असतांना एका रात्री अचानक जाग आली आणि मनात निद्रिस्त नील वनमाला ही ओळ घोळत होती. आजूबाजूला इतकी शांतता होती की शब्द उच्चारला असता तर त्या वातावरणात तो विद्रुप वाटला असता. मी हॉटेलच्या बाल्कनीत आलो. चंद्रप्रकाशात नीलगिरीची झाडं दिसत होती. मी निद्रिस्त नील वनमाला, निद्रिस्त सरोवर खाली या ओळी कुजबुजल्यासारख्या गुणगुणलो. त्या वातावरणात मला आवाजाच्या ध्वनिमानाच्या ज्या मर्यादा होत्या (पहाटे वाजता मी तारसप्तकात गाऊ शकत नव्हतो) त्या मर्यादा सांभाळून मी गात होतो. ते सूर इतके त्या वातावरणाशी प्रामाणिक होते की मर्यादा याच मला त्या गाण्यासाठी पोषक वाटू लागल्या. दोन्ही कडव्यांना पुढच्या पंधरा मिनिटात चाल लागली.

दुसर्‍या दिवशी सकाळी उठलो तेव्हाही आदल्या रात्री दिलेली चाल लक्षात राहिली होती. पुढच्या अर्ध्या तासात माझं संपूर्ण गाणं तयार होतं. संगीत संयोजन करताना भारतीय - पाश्चात्य फ्युजन केलं, कारण एकच क्षण भिंगाखाली धरून त्याची भव्यता दाखवावी असं मनात होतं. पाश्चात्य संगीतातून त्या क्षणाचा भव्यपणा आणि भारतीय संगीतातून त्या क्षणाचा सूक्ष्मपणा दाखवण्याचा प्रयोग केला.

काही दिवसांनीच हे गाणं शंकर महादेवन याच्या आवाजात मी ध्वनिमुद्रित केलं. त्याला मराठी कदाचित समजावून द्यावं लागेल असं मला वाटलं पण चाल ऐकता ऐकताच त्याची जशी चालीला दाद येत होती तशी शब्दांनासुद्धा येत होती. गाणं ऐकल्यावर तो म्हणाला थँक्स फॉर लेटिंग मी सिंग सच ब्युटिफुल पोएट्री!”


हे गाणं आजही ऐकताना गातांना, ऐकवताना चुकता मला इवलाच वेल लववून ये नीज पुन्हा पवनास म्हणताना अंगावरून वार्‍याची झुळूक गेल्याचा भास होतो. एकच क्षण चिरंतन असतो असा आणखी एक छोटा साक्षात्कार होतो(‘क्षितिज जसे दिसते’ या माझ्या पुस्तकातून)

पुस्तक विकत घ्यायचं असेल तर इथून घेऊ शकता - 

बुक गंगा.कॉम वर ‘क्षितिज जसे दिसते’ 
'Kshitij Jase Disate' on Flipkart.com

© कौशल श्री. इनामदार, २०१४

Labels: , , , , , , , , ,