रात्रीचा चहा


मराठी अभिमानगीताच्या प्रकाशनाची तारीख जवळ आली तशी धामधूम वाढलीये. एखाद्या व्हिडियो गेममधे जसं शेवटच्या टप्प्यावर असतांना चारही बाजूंनी आव्हानांचा मारा सुरू होतो, तशी आत्ताची परीस्थिती झालीये! दिवसरात्र एक करून कामं करावी लागतायत, शरीर-मन एकमेकांना थकण्याची परवानगी देत नाही!  मित्र, सहकारी एकत्र आलेत आणि कामाला वेग आलेला आहे. बहुतेक वेळा रात्री उशीरापर्यंत कामं चालतात आणि कधीकधी रात्रभर! अशी सध्याची परीस्थिती! वातावरण भारलेलं आहे.
मला या भारलेल्या वातावरणाचं आकर्षण आहे. आणि अशा वातावरणात, विशेषत: रात्रीच्या वेळी, कामातून पाच मिनिटं विश्रांती म्हणून जो चहा येतो त्याला तोड नाही! सकाळी उठल्यावरचा चहा गरज असते, पण रात्रीचा चहा म्हणजे चैन! 
पूर्वी कॉलेजमध्ये असतांना आम्ही मित्र बरेचदा अभ्यासाचं निमित्त काढून रात्री कुणा एका मित्राकडे राहायचो. मग तास-दोन तास अभ्यासात घालवल्यावर दादर स्टेशनवर ‘बबनचा चॉकलेट चहा’ प्यायला जायचो. ‘बबनचा चॉकलेट चहा’ हा आंतरराष्ट्रीय ब्रँड होऊ शकला असता असं माझं प्रामाणिक मत आहे इतका तो चहा अप्रतीम असायचा. बबनच्या चहाला मुंबईचा स्वाद होता. त्या चहाबरोबर दादर स्टेशनचं रात्री २ किंवा ३ वाजताचं वातावरण फुकट मिळायचं! मुंबई झोपत नाही याचा प्रत्यय आम्हाला याच चहामुळे आला होता. भाजीवाले, फूलवाले यांची वर्दळ असायची, दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रांचे गठ्ठे फलाटावर येऊन पडायचे आणि एकच झुंबड उडायची. नाटकातली मंडळी, मुंबईच्या वर्तमानपत्रांमधले अनेक नामवंत पत्रकार यांची मांदियाळी या रात्रीच्या चहासाठी दादर स्टेशनबाहेर दिसायची. 
नाटकांच्या तालमींच्या वेळीचा रात्रीचा चहा ही एक वेगळी कहाणी. तालमीनंतर किंवा तालमीच्यामध्ये येणारा हा चहा म्हणजे उन्हाळ्यात येणाऱ्या थंड हवेच्या झुळुकेसारखा असतो. मात्र गाण्याच्या कार्यक्रमांच्या वेळी येणारा चहा आणि नाटकाच्या तालमीला घेतलेला चहा, यातही फरक आहे. गाण्याच्या तालमींना चहा आला की तो अ) तालीम करता करता गार करूनच घेतला जातो, (हा चहा एकत्र घेतला जात नाही. प्रत्येकजण आपापला चहा पितो!) किंवा ब) तालीम थांबवली जाते आणि चहा घेताघेता वेगळ्याच विषयावर गप्पा मारल्या जातात. त्या कार्यक्रमाबद्दल काही चर्चा होत नाही. नाटकाच्या चहामध्ये मात्र तालीम थांबवण्यात येते आणि चहा सगळे एकत्र येऊन घेतात. पण चहाच्या वेळी चर्चा ही तालमीबद्दल आणि नाटकाबद्दलच होते!
रात्रीची कॉफीही असते, पण रात्रीच्या चहाबद्दल काहीतरी मराठमोळं आहे, रात्रीची कॉफी थोडी कॉस्मोपॉलिटन आहे! या कॉफीची आपली अशी एक मौज आहे, पण त्याबद्दल आत्ता लिहिणं म्हणजे चहात चुकून एक चमचा कॉफी पडल्यासारखंच होईल – त्यासाठी एक वेगळी सकाळ, आणि एक वेगळी रात्र!
ksinamdar@gmail.com

Labels: , , ,